कर्जाची परतफेड न करता कारसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार
१.३० कोटीच्या फसवणुकप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – कर्जाची परतफेड न करता अहमदाबादच्या व्यापार्याकडून कारसाठी घेतलेल्या १ कोटी ३० लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध ना. म जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात एका महिलेचा समावेश असून या चौघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. ऋषभ पहुजा, प्रकाश पहुजा, दिपीका पहुजा आणि चिराग पहुजा अशी या चौघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा गुन्हा मे २०२३ रोजी लोअर परेल येथील एच. एल नागावकर रोड, मेसर्च टिकमचदास ज्वेलर्स प्रायव्हैट लिमिटेडच्या दुकानासह कार्यालयात घडल्याचे पोलिसांनी सागितले. ध्रुवेश गजेंद्रभाई पटेल हे मूळचे अहमदाबादच्या थालतेज, शांती पॅलेससमोरील श्री नारायण बंगला परिसरातील रहिवाशी असून ते व्यवसायाने व्यापारी आहेत. पहुजा कुटुंबिय त्यांच्या परिचित असून त्यांच्याशी त्यांचे काही वर्षांपासून कौटुंबिक संबंध होते. पहुजा यांनी एका खाजगी कंपनीची एक महागडी कार खरेदी केली होती. या कारसाठी त्यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. ही कार त्यांनी खरेदी करावी यासाठी त्यांनी त्यांना प्रवृत्त केले. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून काही रक्कम घेतली होती. तसेच फायनान्स कंपनीचे पैसे देतो असे सांगितले होते. मात्र या चौघांनी त्यांच्याकडून कारसाठी घेतलेल्या पैशांसह कर्जाची परतफेड न करता त्यांची १ कोटी ३० लाखांची फसवणुक केली होती. हा प्रकार नंतर धु्रवेश पटेल यांच्या लक्षात येताच त्यांनी ना. म जोशी मार्ग पोलिसांत एकाच कुटुंबातील सदस्य असलेल्या चौघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी ऋषभ पहुजा, प्रकाश पहुजा, दिपीका पहुजा आणि चिराग पहुजा या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असून या चौघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.