मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जानेवारी २०२५
मुंबई, – भाड्याने घेतलेल्या सुमारे २२ लाख रुपयांच्या चार वाहनांचा अपहार करुन एका टुर्स व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी हर्ष दिवाकर शर्मा या टुर्स व्यावसायिकाविरुद्ध वाकोला पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
४५ वर्षांचे तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत सांताक्रुज येथील वाकोला ब्रिज परिसरात असून त्यांचा टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्सचा व्यवसाय आहे. ते काही टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्सला व्यवसायासाठी भाड्याने वाहने देतात. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत त्यांची हर्ष शर्माशी ओळख झाली होती. तोदेखील मार्केटमध्ये भाड्याने वाहने पुरविण्याचे काम करत होता. त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती. व्यवसायानिमित्त ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. अनेकदा तो त्याच्या ग्राहकांसाठी त्यांच्याकडे वाहनांची मागणी करत होता. नोव्हेंबर महिन्यांत त्यांनी त्याला चार वाहने एक महिन्यासाठी भाड्याने दिले होते. त्यासाठी त्याने त्यांना प्रत्येक वाहनामागे दहा हजार रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केले होते.
मात्र एक महिन्यासाठी भाड्याने घेतलेले चारही वाहने दोन महिने उलटूनही त्याने परत केले नव्हते. वाहनांचे भाडे दिले नाही. त्यामुळे ते हर्षकडे सतत विचारणा करत होते. याच दरम्यान त्याने त्यांना एक लाखांचा एक धनादेश दिला होता, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. त्याने चारही वाहनांना लावलेले जीपीएस सिस्टीम काढून टाकले होते. या वाहनांचा त्यांनी शोध घेतला होता. त्यात एक इरिटिगा कार घाटकोपर अणि दुसरी इनोव्हा कार त्यांना बदलापूर येथे सापडली. मात्र त्याने या दोन्ही वाहनांची चावी त्यांना परत केली नाही. अशा प्रकारे हर्षने एक महिन्यांसाठी सुमारे २२ लाखांचे चार वाहने घेऊन ते वाहने परत न करता त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वाकोला पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हर्ष शर्माविरुद्ध पोलिसांनी कारचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. हर्षने अशाच प्रकारे इतर टुर्स व्यावसायिकाकडून भाड्याने वाहने घेऊन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.