कार खरेदी-विक्रीच्या व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने फसवणुक
१.६९ कोटीच्या अपहारप्रकरणी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मे २०२४
मुंबई, – कार खरेदी-विक्रीचा नवीन व्यवसाय सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवून गुंतवणुकीच्या नावाने एका व्यावसायिकाची त्याच्याच व्यावसायिक मित्राने १ कोटी ६९ लाख रुपयांची फसवणुक केल्याची घटना मुलुंड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मनोज रामकृष्ण शर्मा या मित्राविरुद्ध मुलुंड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. मनोजने गुंतवणुकीसाठी दिलेल्या पैशांतून दुसरा व्यवसाय सुरु करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
मुलुंडचे रहिवाशी असलेले ५७ वर्षांचे गुरुदिपसिंग पृथी हे व्यावसायिक असून त्यांची पालघरच्या वाडा परिसरात रॉयल एअरकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. सात वर्षांपूर्वी त्यांची मनोज शर्माशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले आहे. याच दरम्यान मनोजने त्यांना जुन्या कार कमी किंमत विकत घेऊन जास्त किंमत विकण्याचा व्यवसाय सुरु करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव आवडल्याने त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने त्याच्यासोबत व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यांच्यात पार्टनरशीप डिड झाले होते. त्यानंतर त्यांनी हाय स्पीड कार नावाची एक कंपनी सुरु केली होती. ठाण्यातील हिरानंदानी पाटीलपाडा, केनोरा अपार्टमेंटमध्ये त्यांनी कंपनीचे कार्यालय सुरु केले होते. कंपनीत गुंतवणुक म्हणून त्यांनी १ कोटी ६९ लाख २५ हजार रुपये जमा केले होते. काही महिन्यानंतर मनोजने त्यांना अठरा लाख रुपये परत केले होते. ही रक्कम परत केल्यानंतर त्याने त्यांच्याकडून एका मर्सिडीज कारसाठी पुन्हा पंधरा लाख रुपये घेतले होते. सुरुवातीला त्याने प्रॉफिटची रक्कम त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा केली, मात्र नंतर त्याच्याकडून पेमेंट येणे बंद झाले होते.
याच दरम्यान त्याने कंपनीच्या बँक खात्यातील एक कोटी स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. याबाबत गुरुदिपसिंग व त्यांच्या पत्नीला त्याने विश्वासात घेतले नव्हते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली होती, मात्र त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. मनोज शर्माचा व्यवहार संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्याच्याशी पार्टनरशीप डीड तोडण्याच निर्णय घेत त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने त्यांना ९८ लाख ५० हजार रुपयांचे चार धनादेश दिले होते, मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते. काही दिवसांनी त्यांना मनोजने त्यांच्या कंपनीचे पैसे रुचिता जयपुरीया या कंपनीत गुंतवणुक केल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी महिलेची भेट घेतली होती. यावेळी तिने मनोजने तिच्याकडे कार आणि महागडे मोबाईल खरेदी-विक्रीच्या व्यवसायासाठी गुंतवणुक केल्याचे सांगितले.
अशा प्रकारे नवीन व्यवसाय सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवून व्यवसायात १ कोटी ६९ लाख रुपयांची गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन मनोज शर्माने या पैशांचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीला विश्वासात न घेता गुंतवणुक केलेल्या पैशांतून अन्य एका महिलेसोबत नवीन व्यवसाय सुरु केला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी मनोज शर्माविरुद्ध मुलुंडच्या लोकल कोर्टात एक याचिका दाखल करुन त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. या याचिकेवर अलीकडेच सुनावणी होऊन कोर्टाने मुलुंड पोलिसांना मनोज शर्माविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक आदीनाथ गावडे यांनी गुरुदिपसिंग यांची जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी मनोज शर्माविरुद्ध ४०६, ४२० भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.