मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ डिसेंबर २०२४
मुंबई, – कार व्यवसायासाठी १ कोटी १७ लाख रुपयांचे कर्ज काढून बँकेचे हप्ते न भरता पार्टनर महिलेची चारजणांच्या एका टोळीने फसवणुक केल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. याप्रकरणी चारही आरोपीविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. राहुल शाह, आकाश मुसळे, टेरेसा स्टिफन आणि निहार चौधरी अशी या चौघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. कर्जाच्या पैशांचा या चौघांनी वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
विजया महेंद्र अनकुटकर ही महिला अंबरनाथची रहिवाशी आहे. राहुल आणि आकाश हे तिच्या परिचित असून त्यांचा कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत वांद्रे येथील बीकेसी, सॉफिटेल हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली होती. या भेटीदरम्यान त्यांनी तिला त्यांच्या व्यवसायात गुंतवणुक करण्याचा सल्ला देताना गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. तिचा विश्वास संपादन करुन त्यांनी तिचे काही वैयक्तिक कागदपत्रे घेतली होती. कार खरेदीसह पर्सनल लोनसाठी विविध बँकेत तिचे कागदपत्रे सादर केले होते. या कागदपत्रांवरुन तिला बँकेने १ कोटी १७ लाखांचे कर्ज मंजूर केले होते. कर्जाची ही रक्कम बँकेत जमा होताच राहुल आणि आकाशने ती रक्कम इतर दोघांच्या बँक खात्यात जमा केले होते.
या पैशांतून कार खरेदी न करता पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला होता. तसेच बँकेच्या कर्जाचे हप्ते न भरता विजय अनकुटकर हिची फसवणुक केली होती. बँकेकडून कर्जाच्या हप्त्याबाबत विचारणा होऊ लागल्यानंतर तिने दोन्ही आरोपींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनी तिला प्रतिसाद दिला नाही. विविध कारण सांगून तिला टाळण्याचा प्रयत्न केला. व्यवसायात गुंतवणुकीस प्रवृत्त करुन तिच्या कागदपत्रांवरुन बँकेतून कारसह वैयक्तिक कर्ज काढून या दोघांनी इतरांच्या मदतीने १ कोटी १७ लाखांचा अपहार करुन तिची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच तिने बीकेसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राहुल शाह, आकाश मुसळे, टेरेसा स्टिफन आणि निहार चौधरी या चौघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून चारही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.