मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ एप्रिल २०२४
मुंबई, – बोगस दस्तावेज सादर करुन कार लोन घेऊन एका नामांकित बँकेची सुमारे ४५ लाख रुपयांची फसवणुक केल्याच्या कटातील इम्रान मेहरहदिनखान हुसैन खान याला मलबार हिल पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत इतर चार ते पाचजणांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
दिपिकाकुमारी सुभाषकुमार या नवी मुंबईतील खारघर परिसरात राहत असून एका नामांकित बँकेत मॅनेजर म्हणून कामाला आहेत. सध्या तिची नेमणूक मलबार हिलच्या नेपियनसी रोडवरील बँकेत आहे. १ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ या कालावधीत त्यांच्या तन्मय तापस सरकार व त्याचा मॅनेजर मित्र इम्रान खान यांनी त्यांच्या बँकेत कार लोनसाठी अर्ज केला होता. या अर्जासोबत त्यांनी जोडलेले सर्व कागदपत्रे बोगस होते. ते कागदपत्रे खरे असल्याचे भासवून त्यांनी बँकेतून ४५ लाख रुपयांचे कार लोन घेतले होते. मात्र कार लोनचे हप्ते न भरता ते दोघेही पळून गेले होते. हा प्रकार नंतर बँकेच्या निदर्शनास येताच त्यांनी कार कंपनीकडे विचारणा केली होती. यावेळी या कंपनीने तीन कर्मचारी विरेंद्र पाल, योगेश्वर चिमटे, बंजन यांनी त्यांचा रिपोर्ट सादर करताना आरोपींनी दिलेल्या कागदपत्रांची कुठलीही शहानिशा केली नसल्याचे उघडकीस आले होते. या कर्मचार्यांनी बँकेचा विश्वासघात करुन बोगस रिपोर्ट सादर केला होता. त्यांच्या रिपोर्टनंतर दोन्ही आरोपींना बँकेने सुमारे ४५ लाख रुपयांचे कार लोन मंजूर केले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघड होताच दिपीकाकुमारी हिच्या तक्रारीवरुन मलबार हिल पोलिसांनी सबंधित सर्व आरोपीविरुद्ध ४२०, ४६८, ४७१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना इम्रान खान हा राजस्थानचा रहिवाशी असून तो त्याच्या चुरु गावात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तिथे पोलीस जाण्यापूर्वीच इम्रान हा पळून गेला होता. तो जयपूर-वांद्रे एक्सप्रेसने प्रवास करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला मुंबईत आणण्यात आले होते. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने इतर साथीदारांच्या मदतीने अशाच प्रकारचे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.