कारणे दाखवा नोटीस निकाली काढण्यासाठी लाचेची मागणी
सीजीएसटीच्या दोन अधिकार्यांना दिड लाखांची लाच घेताना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ मार्च २०२४
मुंबई, – सेवा कराशी संबंधित जारी करण्यात आलेले कारणे दाखवा नोटीस निकाली काढण्यासाठी सहा लाखांच्या लाचेची मागणी करुन दिड लाख रुपयांची लाचेची रक्कम घेताना नवी मुंबईतील बेलापूर कार्यालयातील सीजीएसटीच्या दोन अधिकार्यांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. त्यात सहाय्यक आयुक्त सुहास सी. भालेराव आणि निरीक्षक शुभम दास मोहापत्रा यांचा समावेश आहे. या कारवाईनंतर त्यांच्या कार्यालयासह घराची झडती घेण्यात आली असून त्याचा तपशील समजू शकला नाही.
नवी मुंबईतील बेलापूर परिसरात सीजीएसटी कार्यालय असून तिथेच सुहास भालेराव हा सहाय्यक आयुक्त तर सुभम मोहापात्रा हे निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी तक्रारदाराच्या ट्रान्सपोर्ट कंपनीला करा सेवाशी संबंधित एक कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर तक्रारदारांनी त्यांची भेट घेऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करताना त्यांना आश्वयक असलेले सर्व कागदपत्रे सादर केले होते. मात्र कारणे दाखवा नोटीस निकाली काढण्यासाठी या दोन्ही अधिकार्यांनी त्यांच्याकडे सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच दिली नाहीतर त्यांच्या कंपनीविरुद्ध कारवाईची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी दिड लाख रुपयांची लाच देण्याची तयारी दर्शवून या दोन्ही अधिकार्याविरुद्ध सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी या अधिकार्यांनी बेलापूर येथील सीजीएसटी कार्यालयात सापळा लावून लाचेची दिड लाख रुपयांची रक्कम घेताना सुहास भालेराव आणि शुभम मोहापात्रा या दोघांनाही रंगेहाथ पकडले होते. दरम्यान लाचेच्या गुन्ह्यांत दोन्ही अधिकार्यांच्या अटकेच्या वृत्ताने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. या कारवाईनंतर त्यांच्या शासकीय कार्यालयासह घराची झडती घेण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. त्याचा तपशील मात्र समजू शकला नाही.