दलालांच्या मदतीने पासपोर्ट रॅकेटचा सीबीआयकडून पर्दाफाश
चौदा पासपोर्ट अधिकार्यासह ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ जून २०२४
मुंबई, – अपुर्या आणि बोगस कागदपत्रांच्या मदतीने दलालांच्या मदतीने सुरु असलेल्या पासपोर्ट रॅकेटचा सीबीआयने पर्दाफाश करुन ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात चौदा पासपोर्ट अधिकार्यांचा समावेश असून या सर्वांवर भष्ट्राचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच सीबीआयच्या पथकाने मुंबईसह नाशिक शहरातील ३३ ठिकाणी एकाच वेळेस छापा टाकून मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह कागदत्रांसह डिझीटल पुरावे हस्तगत केले आहेत. लवकरच या प्रकरणात अटकेची कारवाई होणार आहे. दलालांशी हातमिळवणी करुन पासपोर्ट सेवा देण्याचा प्रयत्न उघडकीस होताच संबंधित पासपोर्ट अधिकार्यासह दलालांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर अनेक दलाल पळून गेल्याचे बोलले जाते.
लोअर परेल आणि मालाड येथील पासपोर्ट कार्यालयात काही पासपोर्ट अधिकारी दलालांशी हातमिळवणी करुन मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार करत असल्याची माहिती सीबीआयला प्राप्त झाली होती. संबंधित अधिकारी सहाय्यक आणि वरिष्ठ पासपोर्ट सहाय्यक अधिकारी म्हणून काम करत होते. काही ठराविक रक्कमेचे कमिशन घेऊन संबंधित अधिकारी दलालांच्या नियमित संपर्कात होते. त्यांच्या मदतीने अपुर्या कागदपत्रांसह बोगस दस्तावेजाच्या मदतीने ग्राहकांना पासपोर्ट जारी केले जात होते. याबाबत काही तक्रारी प्राप्त होताच सीबीआयच्या दक्षता विभागाच्या अधिकार्यांनी विभागीय पासपोर्ट अधिकार्यांच्या मदतीने लोअर परेल आणि मालाड येथील पासपोर्ट कार्यालयात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी पासपोर्टसाठी दस्तावेज घेऊन जाणार्या काही दलालांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. या दस्तावेजासह त्यांच्याकडील मोबाईलची पाहणी केल्यानंतर संबंधित दलाल या अधिकार्यांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्याकडे पासपोर्ट कार्यालयातील काही महत्त्वाचे कागदपत्रे, सोशल मिडीयावर मॅसेज तसेच युपीआय व्यवहाराबाब काही नोंदी सापडल्या होत्या. ते आर्थिक व्यवहार पासपोर्ट अधिकारी आणि दलालांमध्ये झाल्याचे दिसून आले आहे. दलालांनी दिलेल्या फाईलचे काम करण्यासाठी त्यांना ही रक्कम पाठविण्यात आली होती. या अधिकार्यांच्या वैयक्तिक तसेच कुटुंबियांच्या सभासदाच्या बँक खात्यातही लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचे सीबीआयने केलेल्या तपासात उघडकीस आले आहे.
प्राथमिक चौकशी वरिष्ठांना सादर केल्यानंतर सीबीआयने शनिवारी मुंबईसह नाशिक परिसरातील काही पासपोर्ट अधिकारी, दलालांच्या घरासह कार्यालयात छापेमारी केली होती. जवळपास ३३ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत पासपोर्टशी संबंधित अनेक आक्षेपार्ह दस्तावेज आणि डिझीटल पुरावे हस्तगत करण्यात आले आहे. याच प्रकरणात ३२ जणांविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात चौदा पासपोर्ट अधिकार्यांचा समावेश आहे. संबंधित सर्वांची लवकरच सीबीआयकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर दोषीवर कारवाई होणार होईल असे सांगण्यात आले. शुक्रवारी ३२ जणांवर बारा ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याने पासपोर्ट अधिकार्यांसह दलालामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.