युपीसीच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक पोर्ट करुन विक्री
एकाच क्रमांकाचे दोन सिमकार्ड; आठजणांच्या टोळीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – युपीसीच्या माध्यमातून बेकायदेशीररीत्या मोबाईल क्रमांक पोर्ट करुन सायबर ठगांना एकाच क्रमांकाचे दोनपैकी एक सिमकार्ड विक्री करुन फसवणुक करणार्या एका टोळीचा मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी वेगवेगळ्या परिसरातून आठजणांना पोलिसांनी अटक केली आहे. महेश महादेव कदम, रोहित कन्हैयालाल यादव, सागर पांडुरंग ठाकूर, राज रविनाथ आर्डे, गुलाबचंद कन्हैया जैस्वार, उस्मानअली मोहम्मद हेजाबुर रेहमान शेख, अबूबकर सिद्धीकी युसूफ आणि महेश चंद्रकांत पवार अशी या आठजणांची नावे आहेत. यातील गुलाबचंद आणि एअरटेल तर महेश हा व्ही कंपनीचा कर्मचारी, उस्मानअली आणि अबूबकर हे शॉप मालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या सर्वांना लोकन कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने गेल्या वर्षभरात तीस हजार सिमकार्डची विक्री केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे.
यातील ५३ वर्षांचे तक्रारदार दादरच्या प्रभादेवी परिसरात राहतात. एका खाजगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मे महिन्यांत त्यांना सोशल मिडीयावर शेअर मार्केटसंदर्भातील एक जाहिरात दिसली होती. त्यात एमएसएफएल स्टॉक ३३ या कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी ती जाहिरात ओपन केली होती. त्यानंतर काही दिवसांत त्यांना संबंधित कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये शेअरसंदर्भातील अपडेट माहिती दिली जात होती. ग्रुपमधील अनेकांनी कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुक केली होती. त्यात त्यांचा चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे ग्रुपच्या ऍडमिनने त्यांनाही शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे काही शेअरमध्ये गुंतवणुक केली होती, त्यात त्यांना चांगला फायदा झाला होता. कंपनीवर विश्वास निर्माण झाल्यानंतर त्यांनी मे आणि जून या दोन महिन्यांच्या कालावधीत कंपनीत ५१ लाख ३६ हजाराची गुंतवणुक केली होती. मात्र या गुंतवणुकीवर त्यांना कुठलाही फायदा मिळाला नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी सायबर सेल पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी जुही पटेल आणि धु्रव एस. मारवाडी नाव सांगणार्या अज्ञात सायबर ठगाविरुद्ध ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, २०१, ३४ भादवीसह ६६ डी. ६६ सी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मौसमी पाटील, पोलीस उपनिरीक्षक आकांक्षा नलावडे, पोलीस हवालदार नवनाथ वेताळे, प्रकाश बावडेकर, पोलीस शिपाई जय गदगे यांनी तपास सुरु केला होता. संबंधित व्हॉटअप ग्रुपची माहिती काढताना पोलिसांना अनेक धक्कादायक खुलासे करण्यात यश आले होते. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून आठजणांना ताब्यात घेतले. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करुन त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना शनिवार १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात महेश, रोहित, सागर आणि राजने गुलाबसह इतर आरोपींना व्हॉटअप ग्रुपमधील असलेले आणि फसवणुकीसाठी वापरलेले मोबाईल क्रमांक पोर्ट करुन दिले होते. युपीसी कोडचा वापर करुन ते कोलकाता ते मुंबईत असे नंबर पोर्ट करण्यात आले होते. महेश हा टिमचा लीडर असून त्यानेच हा संपूर्ण पोर्ट क्रमांकाचा घोटाळा केला होता.
राज, महेश रोहित आणि सागर हे जे ग्राहक सिमकार्ड घेण्यासाठी येत होते. त्यांचे दोन वेळेस बायोमेट्रीक करुन त्यांचे केवायसी दस्तावेज न घेता त्यांना सिमकार्ड देत होते. एक कार्ड ग्राहकांना तर दुसरे कार्ड सायबर ठगांना देत होते. गुलाब हा एका खाजगी टेलिकॉम सेवा पुरविणार्या कंपनीत कामाला होता. जे ग्राहक गुलाबकडे मोबाईल क्रमांक पोर्टसाठी येत होते्. त्यांचा तो युपीसी मिळवत होता. त्यानंतर ते सिमकार्ड तो उस्मानअली आणि अबूबकरला विकत होता. उस्मान आणि अबूबकर या दोघांचे कुलाबा येथे सिमकार्ड दुकान आहे. ते दोघेही विदेशी नागरिकांना कार्डची विक्री करत होते. कमिशनच्या नादात त्यांनी कुठलेही दस्तावेज न घेता गेल्या एक वर्षांत तीस हजाराहून अधिक सिमकार्डची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.