मनी लॉड्रिंगप्रकरणी अटकेची भीती दाखवून 1.38 कोटीची फसवणुक
फसवणुकीप्रकरणी गुजरातच्या व्यावसायिकाला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 मार्च 2025
मुंबई, – मनी लॉडिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अटकेची भीती दाखवून भारतीय खाद्य निगम विभागातून निवृत्त झालेल्या एका वयोवृद्ध महिलेची 1 कोटी 38 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी आशिष कालूभाई हिरपाडा या गुजरातच्या व्यावसायिकाला मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या रक्कमेपैकी 45 लाखांची रक्कम आशिषच्या बँक खात्यात जमा झाली आणि नंतर ही रक्कम इतर काही बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
रोहिणी कंचनलाल भट्ट ही 73 वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार महिला ही ताडदेव परिसरात राहते. तिच्यासोबत तिचा भाऊ बहिण राहत असून ती भारतीय खाद्य निगम विभागातून निवृत्त झाली 11 डिसेंबर 2024 रोजी तिला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन त्याने तिला तिच्या मोबाईल क्रमांकाद्वारे मनी लॉड्रिंगसह इतर अवैध गुन्हेघडल्याचा आरोप करुन तिचे सर्व मोबाई क्रमांक दोन तासांसाठी डिस्कनेक्ट करण्यात आले. तिची दिल्ली बारखंबा पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला एका दुसर्या व्यक्तीने फोन करुन तो दिल्लीतील सीबीआय कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. तिच्या बँक खात्यात 68 कोटीचा गैरव्यवहार झाला असून त्यात तिला दहा टक्के कमिशन मिळाले आहे. त्यासाठी त्याने काही कागदपत्रे पाठविले होते. ते कागदपत्रे तिच्या भावाच्या नावावर होती. या व्यक्तीने तिचे सर्व बँक खाते फ्रिज करण्यात येणार असल्याची धमकी देत तिच्याकडे तिची चौकशी सुरु केली.
तुम्ही सिनिअर सिटीझन असल्याने तुम्हाला टअक करणार नाही. मात्र दर दोन तासांनी तिची चौकशी होणार असल्याचे सांगितले. चौकशी पूर्ण होईपर्यंत तिला कोणाशी संपर्क साधता येणार नाही किंवा कोणाचेही फोन घेता येणार नाही. घरातून बाहेर जाता येणार नाही असे सांगितले. त्यानंतर या व्यक्तीने तिला व्हिडीओ कॉल करुन तिच्या बँक खात्यासह प्रॉपटीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिला तिच्या बँक खात्यात काही रक्कम ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर तिला तिची रक्कम परत मिळेल. तिच्या खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली जाईल असे सांगितले. त्यामुळे तिने 13 डिसेंबर ते 4 फेब्रुवारी 2025 या कालावधीत त्याने दिलेल्या बँक खात्यात टप्याटप्याने 1 कोटी 38 लाख 47 हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर या व्यक्तींनी तिला संपर्क केला नाही. त्यांनी तिचे पैसे परत केले नव्हते. त्यामुळे तिने संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा संपर्क होऊ शकला नाही.
घडलेला प्रकार तिने तिच्या सीएला सांगितला होता. त्याच्याकडून तिला तिची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक झाल्याचे सांगून पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानतर तिने मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलसह सायबर हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी कट रचून पैशांचा अपहार करुन फसवणुक करणे आणि आयटीच्या विविध कलमातर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना फसवणुकीची रक्कम आशिष हिरपाडा या व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले. त्यानंतर या पथकाने गुजरातच्या सुरत शहराचा रहिवाश असलेला आशिष हिरपाडा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. तपासात आशिष हा गुजरातच्या सुरत, मोटा परिसरातील श्याम शिखर रेसीडेन्सीचा रहिवाशी आहे. फसवणुक झालेल्या 1 कोटी 38 लाखांपैकी 45 लाखांची रक्कम रिवा क्रिअशनच्या बँक खात्यात जमा झाली आहे. त्यानंतर ही रक्कम विविध बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. ती कोणाच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल, बँकेचे धनादेश, रिवा क्रिअशन प्रॉपटीसह टीपी स्टुडिओचे रबर स्टॅम्प जप्त केले आहेत. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.