लिंकद्वारे छावा चित्रपट व्हायरलप्रकरणी दुसर्या आरोपीस अटक
नाशिक येथे पोलिसांची कारवाई; आरोपींना पोलीस कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 एप्रिल 2025
मुंबई, – देशभरात 1818 बोगस लिंकवरुन बहुचर्चित छावा चित्रपट प्रदर्शित करुन कॉपीराईट कायद्यांचे उल्लघंन केल्याप्रकरणी दुसर्या आरोपीस दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. विवेक स्नेहल धुमाळ असे या 26 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा नाशिकचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी सांगितले. यापूर्वी याच गुन्ह्यांत सागर माणिक रांधवन या आरोपीस पुण्यातून पोलिसांनी अटक केली आहे. विवेकच्या अटकेने या गुन्ह्यांतील आरोपींची संख्या आता दोन झाली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत असलेला बहुचर्चित छावा चित्रपट 14 फेब्रुवारीला देश-विदेशात प्रदर्शित होताच काही तासांत तो वेगवेगळ्या सोशल मिडीयावरील लिंकवर प्रदर्शित झाला होता. देशभरात 1818 लिंकवर हा चित्रपट विविध डिजीटल प्लॅटफॉर्मवर अनधिकृतपणे अपलोड झाल्याचे उघडकीस आले होते. अशा प्रकारे अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीर चित्रपट अपलोड करुन कॉपीराईट कायद्याचे उल्लघंन केले होते. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यासह वितरणांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. हा प्रकार ऑगस्ट इंटरटेनमेंट प्राव्हेट लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी- सीईओ रजत राहुल हक्सर यांनी सायबर सेल पोलिसात तक्रार केली होती.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकाने तपास सुरु केला होता. हा तपास सुरु असताना दोन दिवसांपूर्वी पुण्यातून सागर रांधवन या तरुणाला पालिसांनी अटक केली होती. त्याने स्कायमूव्हीजएचडीडॉटटेक या लिंकवरुन हा चित्रपट प्रदर्शित केला होता. ही कारवाई सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकाने नाशिकचे पोलीस उपनिरीक्षक दिपक देसाले, पोलीस हवालदार लहाने यांच्या मदतीने विवेक धुमाळ या अन्य एका आरोपीस अटक केली.
विवेकने मूव्हीजप्राईमडॉटएक्सवायझेड नावाचे डोमेन खरेदी केले होते. या नावाने अॅप तयार करुन ते पेसे भरुन त्याने ते अॅप डाऊनलोड करुन छावासह इतर नवीन प्रदर्शित होणारे चित्रपट प्रेक्षिपित केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते. याच गुन्ह्यांत त्याला अटक केल्यानंतर त्याला शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत आगामी दिवसांत अन्य काही आरोपींवर अटकेची कारवाई होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी सांगितले.