मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 सप्टेंबर 2025
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड इस्टेट एजंटला मालाड पोलिसांनी अटक केली. हनसीत हरविंदर सिंग असे या 38 वर्षीय एजंटचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. शॉपच्या डिपॉझिटसह इतर कामासाठी घेतलेल्या सुमारे अकरा लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा हनसीत सिंगवर आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमोल नरेंद्र मेस्त्री हे मालाडच्या गुडीयापाडा परिसरात राहत असून त्यांचा अंधेरी येथे ग्रेको किचन नावाचे एक फर्निचर दुकान आहे. त्यांच्या पूजा आणि मनिषा नावाच्या दोन मैत्रिण असून त्यांना एक अत्याधुनिक सलून सुरु करायचा होता. त्यासाठी ते मालाड परिसरात एक शॉपचा शोध घेत होते. याच दरम्यान त्यांना अनिरुद्ध सिंग याच्या मालकीचे गोरेगाव येथील गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, रुस्तमजी ओझान इमारतीमध्ये एक शॉप उपलब्ध असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी अनिरुद्ध सिंगची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी हनसीत सिंग या इस्टेट एजंटची माहिती सांगून तोच हा संपूर्ण व्यवहार पाहत असल्याचे सांगितले.
जुलै 2024 रोजी त्यांनी हनसीतची भेट घेऊन त्याच्याशी शॉपबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने पाच लाख रुपये डिपॉझिट आणि अडीच लाखांचा भाड्यावर शॉप देण्याची तयारी दर्शविली होती. हा व्यवहार योग्य वाटल्याने त्यांनी त्याला होकार दर्शविला होता. ठरल्याप्रमाणे ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत त्यांनी त्याला टप्याटप्याने ऑनलाईन 8 लाख 56 हजार 700 रुपये पाठविले होते. याच दरम्यान हनसीतने त्याचे वडिल आजारी असून त्यांच्यावर मालाडच्या सरस्वती या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्यासाठी त्याला पैशांची गरज असल्याचे सांगून त्याच्याकडे अडीच लाांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला कॅश स्वरुपात अडीच लाख रुपये दिले होते.
काही दिवसांनी ते त्याच्या वडिलाना पाहण्यासाठी संबंधित हॉस्पिटलमध्ये गेले होते. मात्र तिथे त्याचे वडिल नव्हते. त्यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केल्याचे त्याने सांगितले. काही दिवसांनी त्यांचा शॉपचा ताबा मिळाला आणि त्यांनी तिथे इतर पार्टनरच्या मदतीने सलूनचा व्यवसाय सुरु केला होता. याच दरम्यान त्यांचे त्यांच्या पार्टनरशी वाद होऊ लागले. हा प्रकार हनसीत सिंगला समजताच त्याने त्यांना इतर पार्टनरला वेगळे करतो असे सांगून त्यांच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपये घेतले होते. मात्र त्याने त्याचा शब्द पाळला नाही. त्यात त्यांचा व्यवसाय चालत नसल्याने त्यांनी त्यांचे सलून बंद केले होते.
शॉपचा ताबा दिल्यानंतर त्यांनी अनिरुद्ध सिंग आणि हनसीत सिंग यांच्याकडे त्यांच्या पैशांची मागणी केली होती. मात्र ही रक्कम हनसीतला दिल्याने अनिरुद्ध सिंगने त्याच्याकडेच पैशांची मागणी करा असे सांगितले. त्याच्याकडे पैशांची मागणी केल्यानंतर त्याने त्यांना एक धनादेश दिला, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. शॉपसाठी त्यांनी हनसीतला सुमारे अकरा लाख रुपये दिले होते, मात्र ही रक्कम परत न करता त्याने पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती.
वारंवार पैशांची मागणी करुनही हनसीतने त्यांना पैसे परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर हनसीत सिंगविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता, ही शोधमोहीम सुरु असताना तीन महिन्यानंतर हनसीत सिंगला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.