बोगस सोने गहाण ठेवून ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक
दुसर्यांदा सोने गहाण ठेवण्यासाठी आलेल्या महिलेस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 सप्टेंबर 2025
मुंबई, – बोगस सोने गहाण ठेवून एका वयोवृद्ध ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी चेतना संजय दोशी ऊर्फ चेतना महेंद्र कणसारा या 46 वर्षांच्या महिलेस गोरेगाव पोलिसांनी अटक केली. तिने तक्रारदार ज्वेलर्स व्यापार्याकडे सोनसाखळी गहाण ठेवून सव्वालाख रुपये घेतले होते, दुसर्यांदा ती ब्रेसलेट गहाण ठेवण्यासाठी आली असता तिच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. चेतनाविरुद्ध फसवणुकीचा हा पहिला गुन्हा असून इतर काही गुन्ह्यांची माहिती अद्याप प्राप्त होऊ शकली नाही असे तपास अधिकारी नवनाथ कांगणे यांनी सांगितले.
64 वर्षाचे वयोवृद्ध तक्रारदार भगवतीलाल रंगलाल सोनी हे ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांच्या मालकीचे गोरेगाव येथे मयुर आणि खार परिसरात भगवती नावाचे दोन ज्वेलर्स शॉप आहेत. त्यातील खार येथील शॉपचा सर्व व्यवहार ते स्वत पाहतात तर गोरेगाव येथील ज्वेलर्स शॉपची जबाबदारी त्यांचा मुलगा विशाल सोनी याच्यावर आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्यांच्या शॉपमध्ये चेतना ही पैजन घेण्यासाठी येत होती. त्यामुळे तिच्याशी त्यांची तोंडओळख होती. पंधरा दिवसांपूर्वी तिने त्यांना कॉल करुन आर्थिक अडचण असल्याने सोने गहाण ठेवून तिला काही पैशांची गरज असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी तिला सोन्याचे दागिने घेऊन येण्यास सांगितले होते.
30 ऑगस्टला ती त्यांच्या शॉपमध्ये आली होती. तिने 23 ग्रॅम वजनाची एक सोन्याची चैन गहाण ठेवून त्यांच्याकडून सव्वालाख रुपये घेतले होते. त्यानंतर ती शॉपमधून निघून गेली होती. दुसर्या दिवशी त्यांचा मुलगा विशालने गहाण ठेवलेल्या सोन्याची चैनची पाहणी केली असता ती चैन बोगस असल्याचे त्याच्या लक्षात आले होते. 5 सप्टेंबरला तिने त्यांना पुन्हा कॉल करुन ब्रेसलेट ठेवून कर्ज हवे असल्याचे सांगितले, त्यामुळे त्यांनी तिला शॉपमध्ये येण्यास सांगितले. 7 सप्टेंबरला ती त्यांच्या खार येथील शॉपमध्ये आली होती. यावेळी तिने त्यांना ब्रेसलेट दिले होते. मात्र ते ब्रेसलेट बोगस असल्याचे लक्षात येताच त्यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल केला. त्यानंतर खार पोलिसांनी चेतनाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
हा गुन्हा गोरेगावच्या हद्दीत असल्याने तिला पुढील चौकशीसाठी गोरेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला शुक्रवार 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
चेतना मिरारोडच्या नवखार बिल्डींगच्या कल्पतरु गार्डन अपार्टमेंटच्या 304 मध्ये राहते. तिच्या पतीचे निधन झाले असून तिला तीन मुले आहे. ते दागिने तिच्या पतीचे असून तिला ते बोगस असल्याची माहिती नव्हती. पैशांची गरज असल्याने तिने ते दागिने तारण ठेवून कर्ज घेण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात सांगितले आहे. या गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत खरात, पोलीस निरीक्षक अब्दुल रौफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कांगणे हे तपास करत आहेत.