सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारास अटक
मुंबईसह नवी मुंबईतील सहा सोनसाखळी गुन्ह्यांची उकल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 जानेवारी 2026
मुंबई, – सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील एका सराईत गुन्हेगारास सायन पोलिसांनी अटक केली. मोहन विठ्ठल कोकाटे असे या 49 वर्षीय गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याविरुद्ध 26 हून अधिक सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या अटकेने मुंबईसह नवी मुंबईतील सहा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शनिवारी 24 जानेवारीला यातील तक्रारदार महिला तिच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी सायन हॉस्पिटलमध्ये जात होती. लायन ताराचंद हॉस्पिटल गल्लीतून जाताना एका अज्ञात बाईकस्वाराने तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार एका दक्षा नागरिकाने सायन पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तक्रारदार महिलेची जबानी नोंदवून पोलिसांनी पळून गेलेल्या बाईकस्वाराविरुद्ध सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
शहरातील वाढत्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांनी गंभीर दखल घेत सायन पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत साळुंके, पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल ठोंबरे, किरण भोसले, संजय दळवी, पोलीस हवालदार संदीप जाधव, किरण चुडनाईक, परशुराम धूम, पोलीस शिपाई संदीप पाटील, महेश मोकल, सुरेश बोरगे, रामजी डबडे यांनी तपास सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी आरोपी गुन्हा केल्यानंतर वेशांतर करुन पळून जात असल्याचे आले होते. जवळपास सत्तर ते ऐंशी सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मोहन कोकाटे या 49 वर्षांच्या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तो सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध सोनसाखळी चोरीचे विविध पोलीस ठाण्यात 23 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
यातील बहुतांश गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा सोनसाखळी चोरी करत होता. जामिनावर असताना त्याने तक्रारदार महिलेची सोनसाखळी चोरी करुन पलायन केले. या गुन्ह्यांसह त्याने गोवंडी, सायन, नवी मुंबईतील कौपरखैरणे, सीबीडी बेलापूर, रबाळे आणि नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या अटकेने या सहा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चोकशी सुरु असून त्याच्याकडून या गुन्ह्यांतील सर्व चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.