मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० मे २०२४
मुंबई, – सोनसाखरी चोरीसाठी चोरीच्या बाईक वापर करुन गुन्हे करणार्या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना कुरार पोलिसांनी अटक केली. मोईन यामीन कुरेशी आणि सोहेल निजाम कुरेशी अशी या दोघांची नावे असून ते दोघेही गोवंडीतील शिवाजीनगरचे रहिवाशी आहेत. ते दोघेही चोरीच्या बाईकचा रंग आणि क्रमांक बदलून सोनसाखळी चोरी करत होते. त्यांच्या अटकेने सोनसाखळीसह वाहन चोरीच्या काही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
यातील तक्रारदार मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात राहतात. ९ मेला त्यांची पार्क केलेली बाईक चोरीस गेली होती. दुसर्या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कुरार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बाईक चोरीचा गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अविनाश नलावडे, पोलीस हवालदार हवाळे, पोलीस शिपाई जाधव, तांबे, मांडवे, वेदांते आणि पगारे यांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून मोईन कुरेशी आणि निजाम कुरेशी या दोघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांनीच ही बाईक चोरी केल्याचे उघडकीस आले. मोईन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात सोनसाखळी आणि वाहन चोरीच्या अनेक गुन्हे दाखल आहेत. याच गुन्ह्यांत तो जेलमध्ये होता. ५ मेला तो जेलमधून बाहेर आला होता. बाहेर आल्यानंतर त्याने सोहेलच्या मदतीने कुरार व्हिलेज येथून एक बाईक चोरी केली होती. या बाईकचा रंग आणि क्रमांक बदलला होता. ते दोघेही सोनसाखळी चोरीसाठी चोरीच्या बाईकचा वापर करत होते.
मोईन हा बाईक चालवत होता तर सोहेल हा सोनसाखळी चोरी करायचा. चोरीसाठी ते पहाटे घरातून निघत होते. गुन्हा केल्यानंतर ते दोघेही शंभरच्या स्पीडने बाईक चालवत होते. जेणेकरुन सीसीटिव्ही फुटेजमध्ये चेहरा आणि बाईकचा क्रमांक येणार नाही याची ते दोघेही काळजी घेत होते. चोरीच्या पैशांतून ते दोघेही नशा करत होते. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने अशाच काही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश येणार आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीची एक बाईक जप्त केली असून उर्वरित मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.