सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील आंतराज्य टोळीचा पर्दाफाश
ठाण्यासह पुणे-उत्तरप्रदेशात गुन्हे; चोरीच्या दागिन्यासह घातक शस्त्रे जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
9 सप्टेंबर 2025
ठाणे, – सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील उत्तरप्रदेशातील एका आंतरराज्य टोळीचा डोबिवली पोलिसांनी पर्दाफाश करुन तीन आरोपींना अटक केली आहे. अभय सुनिल गुप्ता, अभिषेक ओमप्रकार जौहरी आणि अर्पित ऊर्फ प्रशांत अवघेश शुक्ला अशी या तिघांची नावे असून ते तिघेही उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहेत. या तिघांकडून पोलिसांनी एक गावठी रिव्हॉल्व्हर, चार जिवंत काडतुसे आणि चोरीचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यांतील बाईक असा 3 लाख 80 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध ठाण्यासह पुणे आणि उत्तरप्रदेशात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
तक्रारदार महिला वयोवृद्ध असून ती डोबिवली परिसरात राहते. 3 सप्टेंबरला सायंकाळी साडेचार वाजता ती ठाकुर्ली, चामुंडा सोसायटी गेटजवळून जात होती. यावेळी बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करुन पलायन केले होते. भररस्त्यात घडलेल्या या घटनेने तिथे उपस्थित लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर तिने डोबिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांत ठाणे शहरात सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे त्याची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला अशा आरोपीविरुद्ध ठोस कारवाईचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक विक्रम गौड, राजेंद्र खेडकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अच्युत मुपडे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण, पोलीस हवालदार सुनिल भणगे, मंगेश शिर्के, पोलीस शिपाई प्रशांत सरनाईक, शिवाजी राठोड, नितीन सांगळे, राजेंद्र सोनावणे, देवीदास पोटे, ज्ञानेश्वर शिंदे यांनी तपास सुरु केला होता. या पथकाने परिसरातील 106 हून अधिक सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. या फुटेजवरुन दोन्ही आरोपीसह त्यांच्या बाईकची माहिती काढण्यात येत होती. तपासात गुन्ह्यांतील बाईक पुण्यातील नारायण पेठ येथून चोरीस गेली होती. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात बाईक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद होती.
याच चोरीचा बाईकचा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत वापर झाला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांतील काही आरोपी डोंबिवली परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल अभय गुप्ता, अभिषेक जौहरी आणि अर्पित शुक्ला या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना सोन्याचे दागिने, एक गावठी रिव्हॉल्व्हर आणि चार जिवंत काडतुसे सापडले. या दागिन्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी मानपाडा आणि डोबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दागिने चोरी केल्याचे सांगितले.
तपासात सोनसाखळी चोरी करणारी ही आंतरराज्य टोळी असल्याचे उघडकीस आले. तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध ठाण्यातील डोंबिवली, मानपाडा पोलीस ठाण्यात प्रत्येक एक, पुणे जिल्ह्यांतील विश्रामबाग, बिवेवाडी, हडपसर पोलीस ठाण्यात चार, उत्तरप्रदेशातील हारगाव व कोतवाली पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. यातील अर्पितविरुद्ध उत्तरप्रदेशात एक हत्येच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघडकीस आले. अटकेनंतर या तिघांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून सोनसाखळी आणि बाईक चोरीच्या गुन्ह्यांची इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण हे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.