लोकलमध्ये सोनसाखळी चोरी करणार्या महिलेस अटक
महिलेविरुद्ध ५९ गुन्ह्यांची नोंद तर सात गुन्ह्यांची उकल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ जून २०२४
मुंबई, – गर्दीचा फायदा घेऊन लोकलमध्ये सोनसाखळी चोरी करणार्या एका रेकॉर्डवरील महिलेस वडाळा रेल्वे पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. यास्मिन शेख असे या महिलेचे नाव असून तिच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचे ५९ हून गुन्ह्यांची नोंद आहे. तिच्या अटकेने सात गुन्ह्यांची उकल करण्यात रेल्वे पोलिसांना आले असून गुन्ह्यांतील सुमारे चार लाखांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
गेल्या काही दिवसांत हार्बर रेल्वेच्या विविध पोलीस ठाण्यात गर्दीच्या वेळेस महिलांच्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. या वाढत्या चोरीच्या घटनेची रेल्वेचे पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल गावकर यांनी गंभीर दखल घेत सर्वच रेल्वे पोलिसांना संबंधित आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी आरोपींच्या अटकेसाठी तीन ते चार विशेष पथकाची नियुक्ती केली होती. त्यात पोलीस निरीक्षक रविंद्र शिवरामवार, पोलीस उपनिरीक्षक जोगेंद्र गावित, वसंत आढारी, पोलीस हवालदार विशाल वर्पे, विलास पाटील, लक्ष्मण घागरे, महिला पोलीस हवालदार माधुरी विरकर, नंदीनी जाधव, पोलीस नाईक राजा भोसले, दिपक कुर्हाडे, राकेश पाटील, महिला पोलीस नाईक रुपाली कदम, निर्मला शिंदे, पोलीस अंमलदार गणेश जगदाळे, सतीश ठोंबरे, सुजीतकुमार येळे, अभिमन्यू जाधव, दत्ता वाघमारे, प्रकाश कांबळे, संतोष खडतरे, राजेंद्र गर्जे, रामजी पुजलवाड, समाधान सानप, श्रीकांत जाधव, विशाल जाधव, महिला अंमलदार दर्शना गावकर, रुपाली खरात यांचा समावेश होता. या पथकाने गुन्हा घडल्यानंतरचे विविध रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज पाहणी करुन आरोपीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. याच प्रयत्नात यास्मिन या सराईत महिलेने सोनसाखळी चोरी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर तिच्या अटकेसाठी पोलिसांनी सापळा लावला होता.
चेंबूर येथे सोनसाखळी चोरीच्या उद्देशाने यास्मिन ही आली होती, यावेळी साध्या वेशात पाळत ठेवलेल्या या पथकाने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तिने अलीकडे केलेल्या सातहून अधिक सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. गर्दीचा फायदा घेऊन तिने आतापर्यंत अनेक महिलांचे दागिने चोरी केले आहे. तिच्याविरुद्ध वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात २१, ठाणे व अंधेरी प्रत्येकी चार, वाशी व दादर प्रत्येकी पाच, बोरिवली व वांद्रे प्रत्येकी एक, सीएसएमटी तीन, कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात पंधरा अशा ५९ हून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघडकीस आले. चोरीनंतर ती दागिने बीकेसी येथील एका ज्वेलर्स व्यापार्याकडे विकत होती. काही वेळेस ती त्याच्याकडून दागिने वितळवून सोन्याची लगड घेत होती. तिच्याकडून चोरी केलेले चार लाख तीन हजार रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. चोरीच्या गुन्ह्यांत तिला यापूर्वीही पोलिसांनी अटक केली होती. कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर ती पुन्हा चोर्या करण्यासाठी विविध रेल्वे स्थानकात येत होती. तिच्या अटकेने सात गुन्ह्यांची उकल झाल्याने तिचा लवकरच इतर पोलिसांकडून ताबा घेतला जाणार आहे.