मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2026
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका डंपरच्या धडकेने रितीका सुनिल चौहाण या सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी रस्त्यावर उतरुन रास्ता रोको केले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान चारकोप पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळाहून पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सुनिल चौहाण हे त्यांच्या कुटुंबासोबत कांदिवलीतील लालजीपाडा, गणेशनगर परिसरात राहतात. रितीकी ही त्यांची सहा वर्षांची मुलगी असून ती याच परिसरातील एका शाळेत दुसरीत शिकत होती. दुपारी साडेबारा वाजता रितीका ही नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती. रस्ता ओलांडत असताना एका भरवेगात जाणार्या डंपरने तिला जोरात धडक दिली होती. त्यात डंपरच्या चाकाखाली आल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली होती.
जखमी अवस्थेत तिला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त रहिवाशांनी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केल्याने दोन्ही बाजूची वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या घटनेनंतर चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. संतप्त रहिवाशांची पोलिसांनी समजूत काढून दोषी डंपरचालकाविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
याप्रकरणी आरोपी डंपरचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून एका अल्पवयीन मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळाहून पळून गेला होता. त्यामुळे परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.