सहा कोटीच्या फसवणुकीनंतर ज्वेलर्स व्यापार्याचे पलायन
व्यवसाय वाढीसह दागिन्यांचा अपहार करुन फसवणुकीचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 मार्च 2025
मुंबई, – घाटकोपर परिसरातील एका व्यापारी कुटुंबियांची सुमारे सहा कोटीची फसवणुक करुन एका ज्वेलर्स व्यापार्याने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. तेजस ललित सोनी असे या आरोपी व्यापार्याचे नाव असून त्याच्यावर व्यवसाय वाढीसाठी गुंतवणुक केलेल्या रक्कमेसह दागिने बनविण्यासाठी दिलेल्या सोन्यासह इतर कामाच्या पैशांचाा अपहार केल्याचा आरोप आहे. तेजस हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
हेमेंद्र हिरालाल जैन हे 62 वर्षीय वयोवृद्ध तक्रारदार व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत घाटकोपर परिसरात राहतात. तेजस सोनी हा त्यांचा परिचित ज्वेलर्स व्यापारी आहे. तो बोरिवलीतील आयसी कॉलनीत राहत असून त्याची कांदिवलीतील चारकोप परिसरात हुन्नर गोल्ड नावाची एक कंपनी आहे. ही कंपनीत सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित आहे. गेल्या काही वर्षांपासून ते दोघेही एकमेकांच्या परिचित असून त्यांच्यात चांगली मैत्री होती. तीन वर्षांपूर्वी हेमेंद्र जैन यांची तेजस सोनीने भेट घेऊन त्यांना त्याच्या कंपनीत गुंतवणुक करण्याची विनंती केली होती. त्याला त्याच्या व्यवसाय वाढीसाठी काही गुंतवणुकदारांची गरज होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या कंपनीत अडीच कोटीची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्याने त्यांना वेळोवेळी चार लाख रुपये परत केले होते.
व्यवसाय वाढीसाठी त्याने त्यांच्यासह त्यांची पत्नी स्वाती हेमेंद्र जैन, मुलगी विनल जैन, सून भक्ती जैन ऊर्फ भानुशाली यांच्याकडून टप्याटप्याने 68 लाख 75 हजार रुपये घेतले होते. या गुंतवणुकीवर त्याने त्यांनाही चार लाख चार हजार रुपये परत करुन त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारे त्याने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांकडून गुंतवणुकीसाठी तीन कोटी एकोणीस लाख रुपये घेतले होते. मात्र त्यांच्या मूळ रक्कमेसह व्याजाच्या रक्कमेचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती. या गुंतवणुकीसोबत हेमेंद्र जैन यांनी त्याच्याकडे 2 कोटी 41 हजार 86 हजार रुपयांचे सोने दागिने बनविण्यासाठी दिले तसेच लेबर चार्जेस म्हणून साडेनऊ लाख रुपये घेतले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना तीन किलो वजनाचे सोन्याचे दागिने बनवून दिले नव्हते. वारंवार विचारणा करुनही तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता. हा संपूर्ण घोटाळा तेजस सोनी जून 2022 ते जून 2024 या कालावधीत केला होता. व्यवसाय वाढीसह दागिन्यांसाठी घेतलेल्या 5 कोटी 92 लाखांचा अपहार करुन त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची फसवणुक करुन पलायन केले होते. तेजस सोनीकडून फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी चारकोप पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीची पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात तेजसने फसवणुक केल्याचे उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याची पोलिसाकडून लवकरच चौकशी होणार आहे.