प्रॉपटी डिलरवरील फायरिंगप्रकरणी पाच आरोपींना पुण्यातून अटक
पुण्यातील जंगलात पळालेल्या आरोपींचा फिल्मी स्टाईलने पाठलाग
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 नोव्हेंबर 2025
मुंबई, – दोन दिवसांपूर्वी कांदिवलीतील चारकोप परिसरात प्रॉपटी डिलर फे्ंरडी डिमेलो याच्यावर झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी मुंबईसह पुण्यातून पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. मुन्ना मयुद्दीन शेख ऊर्फ गुड्डू, राजेश रमेश चौहाण ऊर्फ दया, सुभाष भिकाजी मोहिते, मंगेश एकनाथ चौधरी आणि कृष्णा ऊर्फ रोशन बसंतकुमार सिंग अशी या पाचजणांची नावे आहेत. पोलिसांची माहिती मिळताच पुण्यात पळून गेलेल्या चार आरोपींना जंगलात पाठलाग करुन पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या चौघांना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. आर्थिक वादातून ही फायरिंग झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
ही घटना बुधवारी 19 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता कांदिवलीतील चारकोप, गुरुड पेट्रोलपंपाजवळील रस्त्यावर घडली. फे्ंरडी हा प्रॉपटी डिलर असून त्याच्या कुटुंबियांसोबत कादिवलीतील चारकोप, बंदरपाखडी परिसरात राहतो. बुधवारी दुपारी तो त्याच्या मित्रासोबत कारने एका मित्राला भेटण्यासाठी आला होता. या मित्राला भेटल्यानंतर तो त्याच्या घराच्या दिशेने जात होता. याच दरम्यान तिथे बाईकवरुन तीन तरुण आले. काही कळण्यापूर्वीच त्यातील एक तरुण बाईकवरुन उतरला आणि त्याने त्याच्याकडील देशी बनावटीच्या त्यांच्या दिशेने गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर ते तिघेही तेथून पळून गेले.
या गोळीबारात फे्ंरडी यांच्या पोटात आणि छातीत प्रत्येकी एक गोळी लागली होती. रक्तबंबाळ अवस्थेतही त्यांनी त्यांची कार दिड किलोमीटर चालवून ऑस्कर हॉस्पिटल गाठले होते. त्यानंतर त्यांना तिथे दाखल करण्यात आले होते. ऑपरेशन करुन त्यांच्या पोटासह छातीतील दोन्ही गोळ्या काढण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. या घटनेनंतर चारकोप पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी चारकोप पोलिसांनी घातक शस्त्रांचा वापर करुन हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. आरोपींचा शोध सुरु सअताना पोलिसांनी मुन्ना शेख ऊर्फ गुड्डू याला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर गुन्हे शाखेची एक टिम पुण्यातील भोर परिसरात गेले होते. मात्र पोलिसांची माहिती मिळताच चारही आरोपी जंगलात पळून गेले होते. अखेर पोलिसांनी जंगलात पाठलाग करुन राजेश चौहाण, सुभाष मोहिते, मंगेश चौधरी आणि कृष्णा सिंग या चौघांना अटक केली.
यातील गुड्डू आणि राजेश हे दोघेही कांदिवली, सुभाष विरार, मंगेश पुण्याचा भोर तर कृष्णा हा ठाण्यातील काशिगावचा रहिवाशी आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील एक देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मोबाईल जप्त केले आहेत. तपासात फे्ंरडी आणि राजेश हे दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. त्यांच्या आर्थिक तसेच प्रॉपटीवरुन वाद सुरु होता. याच वादातून त्यांच्यात अनेकदा खटके उडाले होते. त्यातून राजेशने फे्ंरडीचा कायमचा काटा काढायची योजना बनविली होती. त्यासाठी त्याने इतर आरोपींना त्याच्या हत्येची सुपारी दिली होती.
ठरल्याप्रमाणे या आरोपींनी फे्रंडीची रेकी केली होती. ही रेकी केल्यानंतर त्यांनी शुक्रवारी त्याचा गेम करायचा असे ठरविले होते. त्यानंतर तीन आरोपी फे्ंरडीच्या मागे चारकोपपर्यंत आले होते. मित्राला भेटून कारच्या दिशेने जात असताना तीनपेकी एकाने त्याच्या दिशेने देशी बनावटीच्या पिस्तूलमधून गोळीबार केला होता. त्यानंतर ते मुंबईतून पुण्याला पळून गेले होते. मात्र गुड्डीच्या अटकेनंतर या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. पाचही आरोपींची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या सर्वांना पुढील कारवाईसाठी चारकेाप पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे.