चारकोप येथे अज्ञात व्यक्तींच्या गोळीबारात प्रॉपटी डिलर जखमी
मारेकर्यांच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची शोधमोहीम
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 नोव्हेंबर 2025
मुंबई, – मित्राला भेटून घराच्या दिशेने जाणार्या एका प्रॉपटी डिलरवर बाईकवरुन आलेल्या तीनपैकी एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या गोळीबारात फे्ंरडी डिमेलो हा प्रॉपटी डिलर गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर ऑस्कर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्याच्या पोटात आणि छातीत प्रत्येकी एक गोळी लागली असून ऑपरेशनद्वारे दोन्ही गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. विशेष म्हणजे दोन गोळ्या लागूनही फे्ंरडी हा स्वतहून कार चालवत दिड किलो अंतर असलेल्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाला होता. या गोळीबारामागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. मात्र पूर्ववैमस्नातून किंवा प्रॉपटीच्या वादातून हा हल्ला झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी तिन्ही मारेकर्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. मारेकर्यांच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष शोधमोहीम हाती घेतली आहे.
ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजता कांदिवलीतील चारकोप, गुरुड पेट्रोलपंपाजवळील रस्त्यावर घडली. फे्ंरडी हा प्रॉपटी डिलर असून त्याच्या कुटुंबियांसोबत कादिवलीतील चारकोप, बंदरपाखडी परिसरात राहतो. बुधवारी दुपारी तो त्याच्या मित्रासोबत कारने एका मित्राला भेटण्यासाठी आला होता. या मित्राला भेटल्यानंतर तो त्याच्या घराच्या दिशेने जात होता. याच दरम्यान तिथे बाईकवरुन तीन तरुण आले. काही कळण्यापूर्वीच त्यातील एक तरुण बाईकवरुन उतरला आणि त्याने त्याच्याकडील देशी बनावटीच्या त्यांच्या दिशेने गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर ते तिघेही तेथून पळून गेले. या गोळीबारात फे्ंरडी यांच्या पोटात आणि छातीत प्रत्येकी एक गोळी लागली होती.
रक्तबंबाळ अवस्थेतही त्यांनी त्यांची कार दिड किलोमीटर चालवून ऑस्कर हॉस्पिटल गाठले होते. त्यानंतर त्यांना तिथे दाखल करण्यात आले होते. ऑपरेशन करुन त्यांच्या पोटासह छातीतील दोन्ही गोळ्या काढण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे बोलले जाते. ही माहिती मिळताच चारकोप पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
प्राथमिक तपासात तीन आरोपी होते, ओळख पटू नये म्हणून या तिघांनी हेल्मेट आणि तोंडाला रुमाल लावले होते. त्यापैकी एकाने त्याच्या गावठी पिस्तूलने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबारानंतर ते तिघेही बाईकवरुन पळून गेले होते. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांचा चारकोप पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.