एचपी कंपनीचे गॅस सिलेंडर चोरी करणार्‍या आरोपीस अटक

टेम्पोसह चोरीचे गॅस सिलेंडरचा साठा जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 एप्रिल 2026
मुंबई, – कांदिवलीतील चारकोप परिसरात पार्क केलेल्या टेम्पोतून 27 हून अधिक एचपी कंपनीच्या गॅस सिलेंडरच्या चोरीचा चारकोप पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी मनोज सुरेंद्र शर्मा या 32 वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील टेम्पोसह चोरीचे बारा गॅस सिलेंडरचा साठा जप्त केला आहे. उर्वरित गॅस सिलेंडर लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

नंदकुमार रामराज सोनी हे मालाड परिसरात राहत असून कांदिवलीतील चारकोप परिसरातील श्रीजी गॅस सर्व्हिसमध्ये गॅस सिलेंडर डिलीव्हरीचे काम करतात. 25 मार्चला दिवसभर गॅस सिलेंडरची डिलीव्हरी करुन रात्री अकरा वाजता ते त्यांच्या घरी आली होती. चारकोपच्या काका केणी चौकात त्यांनी गॅस सिलेंडर असलेला त्यांचा टेम्पो पार्क केला होता. दुसर्‍या दिवशी आठ वाजता ते टेम्पोजवळ गेले होते. यावेळी त्यांना त्यांच्या टेम्पोचे अज्ञात व्यक्तीने नुकसान करुन टेम्पोमधील भरलेले आणि रिकामे असे 27 हून अधिक गॅस सिलेंडर चोरी करुन पलायन केल्याचे दिसून आले. या घटनेनंतर त्यांनी चारकोप पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे सध्या गॅस सिलेंडरची प्रचंड कमतरता आहे. त्यात काहीजण चढ्या भावात गॅस सिलेंडरची विक्री करत असल्याने त्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांनी गंभीर दखल घेत त्यांच्या टिमला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलस आयुक्त निता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू थोरात, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब पवार, पोलीस हवालदार बाजीराव कराटे, स्वप्निल शिंदे, धनश्याम पाटेकर, पोलीस शिपाई विलास मस्के, आदित्य राणे, सुदेश गायकवाड यांनी तपास सुरु केला होता.

परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने टेम्पोचा माग काढून मनोज शर्मा याला नालासोपारा येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच गॅस सिलेंडरची चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर पोलिसांनी गुन्ह्यांतील टेम्पो आणि चोरीचे गॅस सिलेंडर असा सहा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित गॅस सिलेंडर लवकरच हस्तगत केले जाणार आहे. तपासात मनोज हा नालासोपारा येथील धानीवबाग, हरवटेपाडा, आदिशक्ती सोसायटीमध्ये राहतो. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्याच्याविरुद्ध अशाच इतर काही गुन्ह्यांची नोंद आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page