मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 जुलै 2025
मुंबई, – स्वतच्या पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला तिच्या आईसह सावत्र पित्याने वेश्याव्यवसायास प्रवृत्त करुन तिला विविध हॉटेलमध्ये ग्राहकांसोबत पाठविल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना कांदिवलीतील चारकोप परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पिटा आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी आईसह सावत्र वडिल आणि रिक्षाचालक अशा तिघांना चारकोप पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर या तिघांनाही दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
15 वर्षांची ही मुलगी तिच्या आईसोबत कांदिवलीतील चारकोप परिसरात राहते. तिच्या आईने आरोपीसोबत दुसरे लग्न केले आहे. पाच दिवसांपूर्वी ही मुलगी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी परत आली नाही. त्यामुळे तिच्या आईसह सावत्र पित्याने तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांची मुलगी मिसिंग झाल्याची तक्रार चारकोप पोलिसांत केली होती. तिच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरु केला होता. पिडीत मुलीने तिचा मोबाईल स्वतसोबत नेला होता.
याच मोबाईलच्या सीडीआर आणि लोकेशन प्राप्त करुन चारकोप पोलिसांच्या एका विशेष पथकाने नालासोपारा येथून या मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिची पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली. यावेळी ही मुलगी सतत रडत होती, मला घरी जायचे नाही असे सांगत होती. त्यामुळे तिची पोलिसांनी आपुलकीने चौकशी केली असता त्यातून आलेल्या माहितीने पोलिसांना धक्काच बसला होता. तिच्या राहत्या घरी तिच्या सावत्र पित्याने तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. त्याला त्याची आईची साथ होती. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकीच या दोघांनी तिला दिली होती.
ते दोघेही तिला वेगवेगळ्या ग्राहकांसोबत तिला वेश्याव्यवसायासाठी पाठवत होते. मिरारोड, दहिसर, विरार येथील विविध लॉजमध्ये तिला ग्राहकासोबत पाठविले जाते. त्यासाठी त्यांनी एका रिक्षाचालकाला ठेवले होते. हाच रिक्षाचालक तिला ग्राहकाकडे सोडत होता, त्यानंतर तिला घरी आणत होता. त्यासाठी त्याला प्रत्येक ट्रिपमागे सातशे रुपये मिळत होते. प्रत्येक ग्राहकामागे तिला बाराशे ते दिड हजार रुपये मिळत होते. ही सर्व रक्कम तिची आई आणि सावत्र वडिल घेत होते. आई आणि सावत्र वडिलांकडून सुरु असलेल्या मानसिक व शारीरिक शोषणाला ती प्रचंड कंटाळून गेली होती, तिला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते. त्यामुळे तिने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता.
पाच दिवसांपूर्वी ती घरातून कोणाला काहीही न सांगता नालासोपारा येथे निघून गेली. तिथेच तिची एक मैत्रिण राहत असून तिच्या घरी ती राहत होती. तिची मैत्रिणी पूर्वी याच व्यवसायात होती. मात्र नंतर तिने ते काम सोडून दिले होते. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिचे लग्न लावून दिले होते. हा प्रकार उघडकीस येताच पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पिटा आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिच्या आईसह सावत्र पिता आणि रिक्षाचालक अशा तिघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.