अभिनेत्याच्या कॅफे शॉपवर डल्ला मारणार्या मॅनेजरला अटक
वर्षभरात सुमारे 35 लाखांचा अपहार केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 सप्टेंबर 2025
मुंबई, – वांद्रे येथील एका अभिनेत्याच्या ग्राऊंडेड कॅफे शॉपवर सुमारे 35 लाखांचा डल्ला कारणार्या कॅकेच्या जनरल मॅनेजरला अखेर वांद्रे पोलिसांनी अटक केली. अजयसिंग भरतसिंग रावत असे या आरोपी मॅनेजरचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकलक कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या वर्षभरात अजयसिंगने कॅफेच्या सुमारे 35 लाखांचा अपहार करुन तक्रारदार अभिनेत्याची फसवणुक केल्याचा आरोप आहे. अलीकडेच त्याच्याविरुद्ध अभिनेत्याने वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अभिनेता असलेला जिब्रान फिरोज खान हा वांद्रे येथील 28 वा रोड, गुरु नानक पार्कसमोरील ज्योती सदन अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याच्या मालकीचे वांद्रे येथील माऊंट मेरीजवळ ग्राऊंडेड नावाचे एक प्रसिद्ध कॅफे शॉप आहे. जून 2022 पासून तिथे अजयसिंग हा जनरल मॅनेजर म्हणून काम करत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर संपूर्ण कॅफेची जबाबदारी सोपविली होती. अधूनमधून ते कॅफेमधील व्यवहाराची पाहणी करत होते. कॅकेमध्ये येणार्या ग्राहकांकडून ऑनलाईन आणि कार्डद्वारे पेमेंट थेट त्यांच्या हॉटेलच्या बँक खात्यात जमा होत होते तर कॅश स्वरुपात आलेले पेमेंट अजयसिंग हा नंतर बँकेत जमा करत होता. याबाबत तो त्यांना सतत अपडेट करत होता.
19 सप्टेंबरला त्यांच्या कॅफेचा मॅनेजर प्रमोद यांनी फोन करुन त्यांना कॅफेला माल पुरविणार्या विक्रेत्यांना त्यांच्या मालाचे पेमेंट मिळत नसल्याची तक्रार केली होती. अजयसिंग यांच्याकडे वारंवार विचारणा करुनही ते पेमेंट करत नाही, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे त्यांनी जातीने लक्ष घालावे अशी विनंती केली होती. 22 सप्टेंबरला त्यांनी अजयसिंगकडे विचारणा केली होती. यावेळी त्याने त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता. त्याची वागणुक संशयास्पद होती. त्यामुळे त्यांनी बँक खात्यासह कॅफेमधील विक्रीचे ऑडिटचे आदेश दिले होते.
ऑडिटदरम्यान 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत कॅफेमध्ये 1 कोटी 14 लाख 67 हजार रुपयांची रोख विक्री झाली होती. मात्र बँकेत 79 लाख 67 हजार 110 रुपये जमा झाले होते. उर्वरित रक्कम 34 लाख 99 हजार 940 रुपये अजयसिंग याने बँकेत जमा केले नव्हते. त्यामुळे त्यांनी अजयसिंगला कॉल करुन विचारणा केली होती, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. नंतर त्याने त्यांचे कॉल ब्लॉक केले होते. कॅफेचा संपूर्ण व्यवहाराची जबाबदारी असताना अजयसिंगने सुमारे 35 लाखांचा वैयक्तिक कारणासाठी वापर करुन कॅफेची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात अजयसिंग रावत याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच वैयक्तिक फायद्यासाठी 35 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर त्याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.