फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस एक वर्षांनी अटक
शासकीय कोट्यातील फ्लॅटच्या आमिषाने वयोवृद्धाची फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ ऑगस्ट २०२४
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस दहिसर पोलिसांनी अटक केली. समीर अनंत हरावडे असे या आरोपीचे नाव असून गुन्हा दाखल होताच तो गेल्या एक वर्षांपासून फरार होता, अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत अनंत गोविंद हरावडे आणि विजय किसन देवळेकर हे दोघेही सहआरोपी आहेत.
महिंद्रा कंपनीतून निवृत्त झालेले ६४ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार संपत सखाराम पवार हे दहिसरच्या रावळपाडा परिसरात राहतात. बारा वर्षांपूर्वी त्यांना एक फ्लॅट खरेदी करायचा होता. यावेळी त्यांच्या मित्राने त्यांची ओळख अनंतशी करुन दिली होती. अनंतकडून त्यांची त्यांचा मुलगा समीर आणि मित्र विजयशी ओळख झाली होती. या तिघांनी त्यांना ते गरीब आणि गरजू लोकांना शासकीय कोट्यातील फ्लॅट मिळवून देत असल्याचे सांगितले होते. याच दरम्यान त्यांनी त्यांना दहिसर येथील वीर संभाजीनगर मार्ग, संखेश्वर नगर इमारतीचा एक फ्लॅट दाखविला होता. या फ्लॅटची मूळ किंमत जास्त असली तरी शासकीय कोट्यातून त्यांना तोच फ्लॅट ३२ लाख रुपयांना मिळेल असे सांगितले होते. फ्लॅटची पाहणी केल्यांनतर त्यांना तो फ्लॅट आवडला होता. त्यामुळे त्यांनी फ्लॅटसाठी ३२ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांच्यात संबंधित फ्लॅटचा एक एमओयू बनविण्यात आला होता. सुरुवातीला त्यांनी त्यांना सात लाख रुपये दिले. त्यानंतर ते तिघेही त्यांची फाईल विविध विभागात असून ती क्लिअर करण्यासाठी आणखीन पैसे भरावे लागतील असे सांगू लागले. त्यामुळे त्यांनी त्यांना अकरा लाख पन्नास हजार रुपये दिले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचा ताबा किंवा कागदपत्रे दिले नाही. विचारणा केल्यानंतर ते तिघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. या व्यवहाराबाबत शंका निर्माण झाल्याने त्यांनी फ्लॅटसाठी दिलेल्या साडेअठरा लाखांची मागणी सुरु केली होती. पैसे दिले नाहीतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी त्यांना दोन धनादेश दिले होते, मात्र ते दोन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यामुळे त्यांनी त्याला कॅश स्वरुपात पाच लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित साडेतेरा लाखांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या तिघांविरुद्ध दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर हरावडे या पिता-पूत्रासह विजय देवळेकर या तिघाविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच ते तिघेही पळून गेले होते. याच गुन्ह्यांत समीर हरावडे हा गेल्या एक वर्षांपासून फरार होता. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.