व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने गंडा घालणार्या महिलेस अटक
फसवणुकीची रक्कम मित्रावर उधळपट्टी केल्याचे तपासत उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – गारमेंटसह सुपर मार्केट व्यवसायात प्रचंड फायदा असल्याची बतावणी करुन एका महिला व्यावसायिकासह तिच्या मित्रांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन सुमारे ३६ लाखांना गंडा घालून पळून गेलेल्या एका मुख्य आरोपी महिलेस गजाआड करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. सौम्या राकेश भारद्वाज असे या महिलेचे नाव असून गुन्हा दाखल होताच ती दोन महिन्यांपासून फरा होती. फसवणुकीची तिने तिच्या मित्रावर उधळपट्टी केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून तिची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. तिने व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने आतापर्यंत किती लोकांकडून किती रुपयांची फसवणुक केली आहे याचा पोलिसाकडून तपास सुरु आहे.
नादिया खाजा शेख ही ३४ वर्षांची तक्रादार महिला मालाडच्या चिंचोली बंदर परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून तिच्या पतीचा कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी तिच्या पतीच्या मित्रांकडून त्यांची सौम्याशी ओळख झाली होती. ती गोरेगाव येथील मोतीलाल नगर, शेठीया अपार्टमेंटमध्ये राहत होती. तिने तिचा गार्मेटसह सुपर मार्केटचा व्यवसाय असल्याचे सांगून त्यांना तिच्या व्यवसायात गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर सात ते आठ टक्के व्याज देण्याचे आश्वासन देत तिने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे नादियाने सुरुवातीला तिच्या बचतीतून तिला साडेचार लाख रुपये दिले होते. या गुंतवणुकीवर तिने तिला मार्च ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत नियमित व्याज दिले होते. त्यामुळे तिला तिच्यावर विश्वास बसला होता. याच दरम्यान सौम्याने तिला आणखीन पैसे गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने तिच्या फ्लॅट विक्रीसह सोन्याचे दागिने गहाण ठेवून तिला आणखीन पैसे दिले होते. अशा प्रकारे तिच्या पतीसह मित्रांनी सौम्याला गारमेंटसह सुपर मार्केटच्या व्यवसायासाठी ५९ लाख २३ हजार रुपये दिले होते. काही महिने व्याजाची रक्कम दिल्यानंतर तिने व्याजाची रक्कम देणे बंद केले. याबाबत चौकशी केली असता सौम्याचा कुठलाही गारमेंट व सुपर मार्केटचा व्यवसाय नसल्याचे त्यांना समजले.
व्यवसायाची खोटी माहिती देऊन तिने त्यांच्याकडून घेतलेले पैसे तिचा मित्र इशा दिवान याच्यावर खर्च केल्याचे सांगून तुम्हाला पैसे मिळणार नाही. तसेच पैशांची मागणी केल्यास त्यांना बोगस ड्रग्जच्या गुन्ह्यांत अटक करण्यास प्रवृत्त करु अशी धमकी दिली होती. व्याजापोटी तिने आतापर्यंत २३ लाख ६० हजार रुपये परत केले होते, मात्र सुमारे ३६ लाखांचा परस्पर अपहार करुन तिने नादियाच्या पतीसह मित्रांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी सौम्याविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सौम्या पळून गेली होती. गेल्या दोन महिन्यांपासून तिचा पोलीस शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असतानाच दोन दिवसांपूर्वी सौम्या भारद्वाजला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.