मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाने गंडा घालण्याचा प्रयत्न
म्हाडा फ्लॅट ट्रान्स्फर फसवणुप्रकरणी तोतया वकिल पुतणीला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० जुलै २०२४
मुंबई, – म्हाडा फ्लॅट ट्रान्स्फरसाठी कायदेशीर मदतीचे आश्वासन देऊन गोरेगाव परिसरातील एका ३७ वर्षांच्या व्यावसायिकाची सुमारे वीस लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी राजश्री भाऊसाहेब किरणे ऊर्फ राजश्री पाटील या वकिल महिलेस वनराई पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत विष्णू रामचंद्र महाडिक याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. राजश्री पाटील आणि विष्णू महाडिक यांनी ते मंत्री व राजकीय नेते राधाकृष्ण विखेपाटील यांचे पुतणी आणि जावई असल्याची बतावणी करुन ही फसवणुक केली होती. ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून २००८ पासून या दोघांविरुद्ध अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्याचे बोलले जाते.
राशेखर शिवाजीराव देशमुख हे गोरेगाव येथे राहत असून त्यांचा उसाचा रस विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गोरेगाव येथील विद्या मंदिर शाळेत झाले होते. याच शाळेत साहेबराव फकीरा खांडेकर हे शिक्षक म्हणून काम करत होते. त्यामुळे ते एकमेकांच्या चांगल्या परिचयाचे होते. अनेकदा त्यांच्यात शाळेविषयी चर्चा होत होत्या. त्यांच्या शाळेत चंद्रकांत चालू पाटील हे शिपाई म्हणून कामाला होता. त्याने त्यांच्याकडून सहा लाख रुपये उसने घेतले होते. आर्थिक अडचणीमुळे त्याला ते पैसे परत करता येत नव्हते. चंद्रकांतचे वडिल गिरणी कामगार असल्याने त्यांना म्हाडाचा एक फ्लॅट मिळाला होता. मात्र फ्लॅटसाठी पैसे भरणे शक्य नसल्याने साहेबराव यांनी राशेखर देशमुख यांना म्हाडाचा फ्लॅट घेण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्याकडून मिळालेल्या रक्कमेतून चंद्रकांत हा त्यांना त्यांचे सहा लाख रुपये परत करणार होता. २५ लाखांमध्ये म्हाडाचा फ्लॅट मिळत असल्याने त्यांनी तो फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान त्यांनी त्यांची ओळख विष्णू महाडिक व त्यांची पत्नी राजश्री पाटील यांच्याशी करुन दिली होती. या ओळखीदरम्यान विष्णूने त्यांना तो म्हाडा पॅनलमध्ये असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जावई आहे. त्याची पत्नी राजश्री त्यांची सख्खी पुतणी असून ती व्यवसायाने वकिल असल्याचे सांगितले होते. म्हाडाचा रुम त्यांच्या नावावर करुन देण्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे या दोघांनी आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी म्हाडाच्या फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु केला होता.
विष्णू महाडिक आणि राजश्री विखे पाटील यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांनी त्यांना धनादेशद्वारे एकोणीस लाख तर कॅश स्वरुपात सहा लाख असे २५ लाख रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्यांच्याकडून त्यांना फ्लॅटचे कागदपत्रे आणि चावी देण्यात आली होती. मात्र फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना विष्णू महाडिक आणि राजश्री विखे-पाटील यांनी फ्लॅटचे दिलेले सर्व दस्तावेज बोगस असल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी म्हाडा कार्यालयात जाऊन या दस्तावेजाची शहानिशा केली होती. यावेळी म्हाडा अधिकार्यांनी त्यांच्याकडील दस्तावेज बोगस असून त्यांच्या नावाने म्हाडाने कोणालाही फ्लॅट अलोट केला नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी विष्णू आणि राजश्री यांची भेट घेऊन त्यांच्याकडून पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्यांनी साहेबराव खांडेकर यांना बेदम मारहाण करुन त्यांच्याविरुद्ध खोटी केस दाखल करण्याची धमकी दिली. वारंवार विनंती केल्यानंतर त्यांनी राशेखर देशमुख यांना ४ लाख आरटीजीएस तर एक लाख वीस हजार कॅश स्वरुपात दिले. उर्वरित १९ लाख ८० हजार रुपयांचे धनादेश दिले होते, मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते. अशा प्रकारे त्यांनी १९ लाख ८० हजाराचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली. त्यामुळे त्यांनी अंधेरीतील लोकल कोर्टात त्यांच्याविरुद्ध एक याचिका सादर केली होती.
या याचिकेदरम्यान त्यांना विष्णू महाडिक आणि राजश्री पाटील हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध २००८ पासून अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार वनराई पोलिसांना सांगून या दोघांविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विष्णू महाडिक आणि राजश्री विखे पाटील या दोघांविरुद्ध पोलिसांनी ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या पाच महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या राजश्री पाटीलला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. विष्णू महाडिक हा पळून गेला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.