बँकेत जप्त केलेले फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिषाने फसवणुक
८० वर्षांच्या वयोवृद्धाला गंडा घालणार्या महिलेस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – बँकेने जप्त केलेले दोन फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका ऐंशी वर्षांच्या वयोवृद्धाची १ कोटी २७ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या महिलेस सात महिन्यानंतर बोरिवली पोलिसांनी अटक केली. रोज सुधीर पडबिदरी असे या महिलेचे नाव असून अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत स्मिता पोतदार, संजय पारकर, अभिषेक एस. व्ही असे तिघेही सहआरोपी असून या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
८० वर्षांचे वयोवृद्ध आत्माराम दाजी सावंत हे बोरिवली परिसरात त्यांच्या पत्नीसोबत राहतात. त्यांच्या तीन मुलांपेकी दोन मुले विदेशात तर एक मुलगा बोरिवलीतील चिकूवाडी येथे राहतो. ते एका खाजगी कंपनीतून तर त्यांची पत्नी शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. तेरा वर्षांपूर्वी त्यांची स्मिता पोतदार या महिलेशी ओळख झाली होती. तिने त्यांना कस्तुर पार्क, सह्यादी सोसायटीमध्ये दोन फ्लॅट ऑपशनमध्ये उपलब्ध आहे. त्यापैकी एक फ्लॅट कैलास बोरकर यांच्या मालकीचा असून फ्लॅटवर त्यांनी गृहकर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने दोन्ही फ्लॅट जप्त केले आहे. त्यामुळे त्यांना ते दोन्ही फ्लॅट बँकेतून स्वस्तात मिळवून देते असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला होता. या दोन्ही फ्लॅटसाठी ते इच्छुक होते, त्यामुळे त्यांनी तिच्यासह संजय पारकर यांना होकार दिला होता. टोकन म्हणून त्यांनी त्यांना ऍसेस मॅनेजमेंट ऍण्ड रिर्सोसेस कंपनीच्या नावाने ८० हजार रुपये दिले होते.
काही दिवसांनी त्यांनी त्यांची ओळख अभिषेक आणि रोझ पडबिदारी यांच्याशी करुन देताना ते दोघेही फ्लॅट खरेदी-विक्री व्यवहारात त्यांना मदत करणार असल्याचे सांगितले. दोन्ही फ्लॅटचे लोकल कोर्टात खटले सुरु होते. त्यामुळे फ्लॅटचा ताबा मिळण्यासाठी उशीर होणार होता. याच दरम्यान त्यांनी दोन्ही फ्लॅटचे रजिस्ट्रेशनसाठी त्यांना बोलाविले होते, मात्र रजिस्ट्रेशनसह इतर कामासाठी पैसे घेऊन त्यांनी रजिस्ट्रेशन केले नाही. फ्लॅटसह रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी स्मितासह इतर तिघांनाही १ कोटी २७ लाख रुपये दिले होते. मात्र कोर्टात खटला सुरु असल्याने दोन्ही फ्लॅटचा ताबा मिळविण्यास विलंब होत असल्याचे सांगून ते चौघेही त्यांना टाळत होते. त्यामुळे त्यांनी वरळीतील बँकेत जाऊन चौकशी केली करताना त्यांना डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल मुंबईचे लेटर दाखवून फ्लॅटचा ताबा कधीपर्यंत मिळेल याबाबत विचारणा केली होती. यावेळी बँक अधिकार्यांनी त्यांच्याकडे असलेले सर्व दस्तावेज असल्याचे सांगून या दोन्ही फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार कोणाशीही झालेला नाही.
या माहितीनंतर त्यांना धक्काच बसला होता. या चौघांनी बोगस दस्तावेज सादर करुन बँकेने जप्त केलेले दोन्ही फ्लॅट स्वस्तात देतो असे सांगून त्यांच्याकडून सुमारे सव्वाकोटी रुपये घेतले होते. फ्लॅटचे रजिस्ट्रेशन किंवा ताबा न देता त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी पैसे परत न करता त्यांच्या पैशांचा परस्पर अपहार केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर स्मिता पोतदार, संजय पारकर, अभिषेक एस. व्ही, रोझ पडबिदरी यांच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन एक कोटी सत्तावीस लाखांचा अपहारासह फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.
गुन्हा दाखल होताच चारही आरोपी पळून गेले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या सात महिन्यांपासून फरार असलेल्या रोझ पडबिदरी हिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर तिला गुरुवारी कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.