मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 सप्टेंबर 2025
मुंबई, – शेअरची परस्पर विक्री करुन सुमारे 62 लाख रुपयांचा अपहार करुन कंपनीच्या खातेदाराची फसवणुक करणार्या एका टोळीचा मालाड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अपहारासह फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत कंपनीच्या आजी-माजी कर्मचार्यासह चारजणांना पोलिसांनी अटक केली आहे. योगेश प्रकाश इंदलकर, ओमकार चेट्टीयार, गोपाळ मढवी आणि विजय पवार अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दृष्यंत चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. यातील गोपाळ हा तक्रारदाराच्या कंपनीतील आजी तर ओमकार हा माजी कर्मचारी आहेत. या दोघांनीच इतर दोघांच्या मदतीने हा संपूर्ण कट रचून फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या चारही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने शुक्रवार 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
भरत नानूभाई शिरोया हे त्यांच्या कुटुंबियांसोबत कांदिवलीतील महावीरनगर परिसरात राहतात. मालाड येथे असलेल्या कम्फर्ट सिक्युरिटी लिमिटेड या कंपनीत 23 वर्षांपासून संचालक म्हणून काम करतात. ही कंपनी शेअर ब्रोकिंगचे ट्रेडिंग आणि डिमॅट अकाऊंटचे काम करते. ग्राहकांकडून बँकेच्या माध्यमातून पैसे घेतल्यांनतर कंपनीकडून ग्राहकांना एक विशेष कोड दिले जाते. त्यानंतर या कोडवरुन संबंधित ग्राहकांचे सर्व व्यवहार चालतात. त्यांच्या पैशातून शेअरमध्ये गुंतवणुक करुन त्याचा फायदा ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केला जातो. कंपनीकडे दहा हजाराहून सभासद आहे. त्यांच्याच कंपनीतील जयेश शामजीभाई पटेल नावाचे एक सभासद आहे. त्यांच्या बँक खात्यातून 62 लाख 33 हजार 491 रुपये दुसर्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाले होते. कंपनीच्या एका कर्मचार्याने त्यांच्याशी संपर्क साधून कोणतीही केवायसी व्हेरीफाय केले नव्हते तर दुसर्या व्यक्तीने त्यांचा मोबाईल क्रमांक मॉडीफाईड करुन कंपनीची फसवणुक केली होती.
24 जुलै 2025 रोजी भरत शिरोया हे कामावर हजर झाल्यानंतर कंपनीच्या कर्मचारी अनुष्का यांनी जयेश पटेल यांचे केवायसी अपडेट करायचे आहे असे सांगितले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या सिस्टीममध्ये जयेश पटेल यांच्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना हा आर्थिक घोटाळा दिसून आला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्याची शहानिशा सुरु केली होती. तपासात जयेश पटेल यांनी कंपनीला कुठलेही मॉडीफिकेशन फॉर्म, पॅनकार्ड, आधारकार्ड, बँकेचे कॅन्सल चेक आणि स्वाक्षरीचे पत्र दिले नव्हते. तरीही त्यांच्या शेअरची परस्पर विक्री करुन त्यांच्या बँक खात्यात 62 लाख 33 हजार 491 रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. त्यांच्या खात्यातून सात ऑनलाईन व्यवहार होऊन 5 जून ते 4 जुलै 2025 या कालावधीत ही रक्कम सातारा येथील एका अज्ञात व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती.
फसणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच भरत शिरोया यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिंदे यांच्याकडे सोपविला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. तपासात ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, ते बँक खाते सातारा येथे राहणार्या योगेश इंदलकर याचे होते, त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिंदे, पोलीस हवालदार शिंदे व अन्य पोलीस पथकाने योगेशला ताब्यात घेतले.
त्याच्या चौकशीतून इतर तिघांची नावे उघडकीस आले. त्यानंतर मुंबईसह नवी मुंबईतून ओमकार चेट्टीयार,विजय पवार आणि गोपाळ मढवी या तिघांना अटक केली. तपासात ओमकार कम्फर्ट सिक्युरिटी लिमिटेडचा माजी तर गोपाळ हा तिथे सध्या नोकरी करत असल्याचे उघडकीस आले. या दोघांनी ही रक्कम योगेश इंदलकर याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. त्यानंतर ती रक्कम बँकेतून काढून त्यांनी आपसांत ही रक्कम वाटून घेतली होती.
अटकेनंतर या सर्वांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांनी फसवणुकीच्या रक्कमेची कुठे विल्हेवाट लावली, या रक्कमेची कुठे गुंतवणुक केली आहे का, या कटात इतर कोणाचा सहभाग आहे याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिंदे हे तपास करत आहेत.