डिपॉझिटसह सलोनच्या सामानाचा अपहारप्रकरणी आरोपीस अटक
गुन्हा दाखल होताच गेल्या आठ महिन्यांपासून फरार होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – डिपॉझिटच्या साडेपाच लाखांसह सलोनच्या तीन लाखांच्या सामानाचा अपहार करुन पळून गेलेल्या एका मुख्य आरोपीस गोरेगाव पोलिसांनी अटक केली. नवरतन गुरुचरण विश्वकर्मा असे या आरोपीचे नाव असून गुन्हा दाखल होताच तो गेल्या आठ महिन्यांपासून फरार होता. या गुन्ह्यांत संजय लठानिया ऊर्फ जमाल सहआरोपी असून या दोघांनी संगनमत करुन ही फसवणुक केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान अटकेनंतर नवरतन विश्वकर्माला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अलका सैनीजीत गायकवाड ही महिला मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात राहते. तिचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय आहे. तिचा गोरेगाव येथे ब्युटीपार्लरचे एक शॉप होते. याच दरम्यान तिची नवरतन विश्वकर्माशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान त्याने त्याचा मित्र संजय लठानिया हा एका बिल्डरकडे कामाला आहे. त्याच्याच प्रोजेटमध्ये त्याने तिला तिच्या सलोनसाठी एक चांगली जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसांनी त्याने तिला कांदिवलीतील शंकरगल्ली, शताब्दी हॉस्पिटलजवळ एक जागा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ती नवरतन आणि संजयसोबत तिथे जागा पाहण्यासाठी गेली होती. ती जागा तिला आवडली होती, त्यामुळे तिने तिच्या सलोनसाठी ती जागा भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला होता.
चर्चेअंती त्यांच्यात डिपॉझिट साडेपाच लाख देण्याचे ठरले होते. मात्र तिच्याकडे तीन लाख रुपये असल्याने तिने त्यांना तीन लाख रुपये दिले होते. जागा मिळेपर्यंत त्यांनी तिच्या दुकानातील सामान गोरेगाव येथील संतोषनगर,शिवशाही अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमध्ये दिले होते. त्यामुळे तिने आधीच्या भाड्याची जागा खाली करुन तिचे सर्व सामान शिवशाही अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमध्ये ठेवले होते. काही दिवसांनी तिने ते सामान मिरारोड येथे शिफ्ट केले होते. त्यासाठी ती नवरतनच्या मित्राला दरमाह पाच हजार रुपये देत होती.
याच दरम्यान तिने डिपॉझिटची अडीच लाख रुपये त्यांना दिली होती. तसेच त्यांच्याकडे सलोनसाठी जागा लवकरात लवकर देण्याची विनंती केली होती. त्यांनीही तिला जून 2024 पर्यंत जागेचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी तिला जागेचा ताबा दिला नव्हता. याबाबत विचारणा करण्यासाठी ती कांदिवली येथे गेली होती. यावेळी तिथे काम करणार्या बांधकाम मॅनेजरने तो नवरतन आणि संजय नावाच्या कुठल्याही व्यक्तींना ओळखत नसून ही जागा त्यांनी कोणालाही सलोनसाठी भाड्याने दिली नसल्याचे सांगितले. त्यामुळे तिने त्यांच्याकडे डिपॉझिटची साडेपाच लाखांच्या रक्कमेची मागणी सुरु केली होती.
याच दरम्यान तिला तिच्या मिरारोड येथील एका फ्लॅटमध्ये ठेवलेले सलोनचे सुमारे तीन लाखांचे सामान त्यांनी अपहार केल्याचे दिसून आले. अशा प्रकारे नवरतन आणि संजय यांनी सलोनसाठी जागा देण्याचे तसेच तिचे सामान ठेवण्यासाठी जागा देऊन तिच्या सामानाचा परस्पर अपहार केला होता. या दोघांनी तिची साडेआठ लाखांची फसवणुक केली होती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर नवरतन विश्वकर्मा आणि संजय लठानिया यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या नवरतनला आठ महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यासह संजयने भाड्याने व्यावसायिक गाळा देतो असे सांगून इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.