दहा हजार अनलिस्टेड शेअरसाठी घेतलेल्या दिड कोटीचा अपहार
वॉण्टेड व्यावसायिकाला दुसर्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 नोव्हेंबर 2025
मुंबई, – दहा हजार अनलिस्टेड शेअरसाठी घेतलेल्या सुमारे दिड कोटीचा अपहार करुन एका खाजगी कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या व्यावसायिकाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. रजत अमरचंद जैन असे या व्यावसायिकाचे नाव असून तो मूळचा बंगलोरचा रहिवाशी आहे. रजतने अशाच प्रकारे इतर काही खाजगी कंपन्यांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याला अशाच एका गुन्ह्यांत यापूर्वीही बोरिवली पोलिसांनी अटक केली होती, आता त्याला दुसर्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
60 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार विजय प्रविणचंद्र शाह हे बोरिवली परिसरात राहत असून त्यांचा शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. गेल्या वीस वर्षांपासून ते शेअरमार्केटमध्ये डिलर म्हणून काम पाहतात. एप्रिल महिन्यंत त्यांना त्यांच्या परिचित यशस्वी फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे परिमल मोदी यांनी संपर्क साधला होता. त्यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे 50 हजार अनलिस्टेड शेअरची गरज होती. त्यामुळे त्यांनी त्यांना अशा शेअरची मागणी मागणी केली होती. त्यांच्याकडे अनलिस्टेड शेअर नसल्याने त्यांच्या परिचित कुणाल दिनेश बिहारी यांनी त्यांना रजत जैनशी माहिती दिली होती. रजतकडे मोठ्या प्रमाणात अनलिस्टेड शेअर असल्याचे सांगून त्याला संपर्क साधण्यास सांगितले होते.
रजत हा बंगलोरच्या टी दसरहल्ली, एस. एम. रोड, शांतीनिकेतन अपार्टमेंटमध्ये राहत असून त्याची रक्षा माता व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक खाजगी कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून तो विविध कंपन्यांना शेअरची विक्री करत असल्याची माहिती विजय शाह यांना मिळाली होती. तयामुळे त्यांनी रजत जैनला संपर्क साधून त्याच्याकडे 50 हजार अनलिस्टेड शेअरची मागणी केली होती. त्यानेही त्याने होकार देत प्रत्येक शेअरमागे दिड हजार रुपये घेणार असल्याचे सांगितले होते. त्याने त्याचे डिमॅट अकाऊंटची डिटेल पाठवून टिडीएस कट करुन 50 हजार शेअर ट्रान्स्फर करण्याचे आश्वासन दिले होते.
ठरल्याप्रमाणे विजय शाह यांनी यशस्वी फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने त्याला 50 हजार अनलिस्टेड शेअरसाठी 7 कोटी 49 लाख 30 हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. पैसे ट्रान्स्फर केल्याचे बँकेचे युटीआर पुरावा म्हणून त्यांनी त्याला व्हॉटअपवर पाठविले होते. मात्र पैसे ट्रान्स्फर करुनही त्याने त्यांना शेअर पाठविले नव्हते. 11 एप्रिलला त्याने विशाल श्रीवास्तव यांच्या डिमॅट खात्यातून त्यांना 28 हजार 500 शेअर पाठविले होते. याबाबत त्यांनी विचारणा केल्यानंतर त्याने त्याचा पासवर्ड मिसमॅच झाल्याने दुसर्या खात्यातून शेअर पाठविल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी त्याच्याकडे उर्वरित 21 हजार 500 शेअरसाठी विचारणा सुरु केली होती.
सतत विचारणा केल्यांनतर त्याने 16 एप्रिलला त्यांना आणखीन 11 हजार 500 शेअर पाठविले होते. ते शेअर त्यांना पुन्हा विशाल श्रीवास्तव यांच्या डिमॅट खात्यातून पाठविणत आले होते. अशा प्रकारे त्याने एप्रिल महिन्यांत त्यांना 40 हजार अनलिस्टेड शेअर पाठविले होते, मात्र दहा हजार शेअर पाठविले नाही. मात्र त्यांना दहा लाख रुपये परत पाठविले होते. दहा हजार शेअर पाठवत नसल्याने त्यांनी त्याच्याकडे उर्वरित पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्यांना पैसे पाठविले नाही किंवा शेअर दिले नाही. त्यामुळे विजय शाह हे त्यांचा मित्र कुणाल बिहारी याच्यासोबत त्याच्या बंगलोर येथील घरी गेले होते. मात्र तो त्यांना घरी सापडला नाही.
कॉल केल्यानंतर रजत जैनने पैसे परत करणार नाही किंवा शेअरही देणार नाही असे सांगून बंगलोरमध्ये कुठे थांबला आहात ते सांगा तिथे येऊन तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर ते दोघेही मुंबईत परत आले होते. त्यानंतर ते सतत त्याच्याकडे शेअरबाबत विचारणा करत होते. मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच विजय शाह यांनी रजत जैनविरुद्ध बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रजतविरुद्ध पोलिसांनी दहा हजार अनलिस्टेड शेअरच्या 1 कोटी 40 लाखांचा अपहार करुन तक्रारदारासह एका खाजगी कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
याच गुन्ह्यांत त्याला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. रजत जैन हा अशा प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपी आहे. यातील एका गुन्ह्यांत त्याला बोरिवली पोलिसांनी अटक केली होती, आता त्याला दुसर्या गुन्ह्यांत अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.