फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस तीन महिन्यांनी अटक

विदेशात नोकरीच्या आमिषाने अनेकांना गंडा घातल्याचे उघडकीस

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 एप्रिल 2025
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस तीन महिन्यांनी चारकोप पोलिसांनी अटक केली. अब्दुल्ला हुसैन आलम शेख असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत संजय विश्वकर्मा हा सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी विदेशात नोकरीच्या आमिषाने आतापर्यंत अनेकांना गंडा घातला आहे. जानेवारी महिन्यांत तक्रारदारासह पाचजणांनी दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीची तक्रार केली होती.

हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करणारे मोहम्मद हसन मोहम्मद गुलाब रसुल हे मूळचे कर्नाटकचे रहिवाशी आहेत. त्यांचा 23 वर्षांचा मुलगा हैद्राबाद येथे चालक म्हणून काम असून तो त्याच्या कुटुंबियांसोबत तिथे राहतो. पाच वर्षांपूर्वी सोशल मिडीयावर त्यांना एक खाजगी व्हिडीओ दिसला होता. त्यात संबंधित चॅनेलचा संजय विश्वकर्मा हा काही गरजू आणि बेरोजगार तरुणांना विदेशात नोकरीसाठी पाठवत असल्याचे दिसले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला विदेशात नोकरीसाठी संजय विश्वकर्माला कॉल केला होता. यावेळी संजयने त्यांना त्यांच्या मुलाला विदेशात चालक म्हणून चांगला पगाराची नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते.

याच संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी ते कर्नाटक येथून त्याच्या कांदिवलीतील कार्यालयात आले होते. या भेटीदरम्यान त्याने त्यांना मुलाला मलेशिया येथे पाठविण्याचे आमिष दाखविले होते. त्याचा पासपोर्टसह व्हिसा, तिकिट, वर्क परमीट, प्रोसेसिंग फी आदीसाठी त्यांनी त्याला टप्याटप्याने चार लाख नऊ हजार रुपये दिले होते. ही सर्व रक्कम त्यांनी ऑनलाईन ट्रान्स्फर केली होती. काही दिवसांनी त्याने त्यांना त्यांच्या मुलाचे अपॉईटमेंट लेटर, वर्क परमीट, विमान तिकिट पाठविले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांना व्हिसा देतो असे सांगितले. त्यामुळे ते सर्वजण मुंबईत आले होते. मुलाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोडून ते पुन्हा कर्नाटकला जाणार होते.

मात्र मुंबईत आल्यानंतर वारंवार कॉल करुनही संजयने त्यांना प्रतिसाद दिला नाही. तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. चौकशीदरम्यान संजयचा कांदिवलीतील चारकोप परिसरातील कार्यालय अब्दुल्ला शेख याच्या मालकीचे होते. संजय हा अब्दुल्लाच्या सांगण्यावरुन अनेकांना विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेत होता. मात्र कोणालाही विदेशात न पाठवता त्यांनी दिलेल्या पैशांचा अपहार करत असल्याचे समजले. त्याने अशाच प्रकारे शहजाद झाकीर सईद, तेलुकाला त्रिनाथ, पूनम मधुकर जाधव, मुनीर अब्दुल लतीफ शेख यांच्याकडून त्यांच्या मुलांना विदेशात नोकरीचे आमिष दाखवून पेसे घेतले होते.

अशाच प्रकारे अब्दुल शेख आणि संजय विश्वकर्माने पाचजणांकडून आठ लाख एकोणीस हजार रुपये घेतले होते. मात्र कोणालाही विदेशात नोकरीसाठी पाठविले नाही. पैशांची मागणी केल्यानंतर ते दोघेही टोलवाटोलवी करत होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच मोहम्मद हसन रसुल यांनी चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अब्दुल्ला शेख आणि संजय विश्वकर्मा या दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या अब्दुल्ला हुसैन शेख याला तीन महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर गुन्हे केल्याचे बोलले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page