लंडन येथे नोकरीसह व्हिसासाठी नेपाळी जोडप्याची फसवणुक
वॉण्टेड असलेल्या कंपनीच्या सिनिअर व्हिसा कॉन्सलरला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 नोव्हेंबर 2025
मुंबई, – लंडन येथे नोकरीसह व्हिसासाठी एका नेपाळी जोडप्याची फसवणुक केल्याप्रकरणी अचिव इंटरनॅशनल कंपनीच्या सिनिअर व्हिसा कॉन्स्लर आकांक्षा राजेंद्र तिवारी हिला कांदिवली पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत आकांक्षा सध्या पोलीस कोठडीत असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याच गुन्ह्यांत कंपनीचा मालक रोहित सोनगरा हा सहआरोपी असून या दोघांनी या नेपाळी जोडप्याची सुमारे 27 लाखांची फसवणुक केली आहे. आकांक्षाच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
विकास विदुरकुमार खतिवडा मूळचा नेपाळचा रहिवाशी असून त्याचा इंजिनिअरिंग कन्सलटिंगचा व्यवसाय आहे. तो अनेकदा त्याच्या आग्रीपाडा येथील मित्राच्या घरी येत होता. त्याच्याच घरी राहत होता. त्याची पत्नी मोनिका दहाल हिला लंडन शहरात नोकरी करण्याची इच्छा होती. त्यासाठी तो मुंबई शहरात नोकरीसह व्हिसा देणार्या काही एजन्सीची माहिती घेत होता. याच दरम्यान त्याच्या पत्नीला सोशल मिडीयावर एका खाजगी कंपनीची माहिती प्राप्त झाली होती. त्यात या कंपनीने युके, कॅनडा, ऑस्टे्रलिया, युरोप सेक्टरसह इतर देशांचा नोकरीसह व्हिसा दिल्याचे सक्सेस स्टोरी व्हिडीओ आणि फोटो अपलोड केल्याचे दिसून आले होते.
तिने संबंधित व्यक्तींच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिची आकांक्षाशी ओळख झाली होती. तिने ती अचिव इंटरनॅशनल कंपनीत सिनिअर व्हिसा कॉन्सलर म्हणून काम करत असल्याचे सांगितले. तिने तिच्याकडे लंडनच्या कामासह व्हिसाबाबत चौकशी केली होती. यवेळी तिने कंपनीचे मालक रोहित सोनगरा असल्याचे सांगून तिचे लंडनला नोकरीसह व्हिसाचे काम होईल असे आश्वासन दिले होते. त्यासाठी तिने तिला कंपनीच्या कार्यालयात मिटींगसाठी येण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ती तिच्या पती विकास खतिवडा याच्यासोबत कांदिवलीतील रघुलिला मॉलमधील सचिव इंटरनॅशनल कंपनीच्या कार्यालयात गेली होती. यावेळी तिला आकांक्षाने लंडन देशातील वर्क व डिपेंडन्ट व्हिसा आणि नोकरीसाठी किमान 25 हजार पाऊंड खर्च अपेक्षित असल्याचे सांगून आगाऊ दोन लाख रुपये आधी जमा करावे लागतील असे सांगितले. त्यामुळे तिने प्रोसेसिंगसाठी तिला दोन लाख रुपये व तिच्यासह तिच्या पतीचा पासपोर्ट दिला होता.
जून 2024 ते मे 2025 या कालावधीत आकांक्षा आणि रोहितच्या सांगण्यावरुन तिने आणखीन 25 लाख 44 हजार 132 रुपये ट्रान्स्फर केले होते. या पेमेंटनंतर ती नियमित आकांक्षा आणि रोहित सोनगरा यांच्या संपर्कात होती. या दोघांकडून प्रोसेसिंग सुरु असून लवकरच त्यांना नोकरीचे नियुक्तपत्र व व्हिसा प्राप्त होईल असे सांगण्यात आले. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी मोनिकाला नोकरीसह वर्क व्हिसा तसेच तिच्या पतीचा डिपेडन्ट व्हिसा दिला नाही.
विचारणा केल्यांनतर ते दोघेही विविध कारण सांगून तिच्यासह तिच्या पतीला टाळण्याचा प्रयत्न करत होते. काही दिवसांनी त्यांना कांदिवलीतील कंपनीच्या कार्यालयाला टाळे असल्याचे दिसून आले. नंतर त्यांना त्यांनी मालाड येथे कार्यालय थाटल्याचे समजले, मात्र तिथे त्यांना आकांक्षा आणि रोहित सापडले नाही.
नोकरीसह व्हिसासाठी घेतलेल्या 27 लाख 44 हजाराचा अपहार करुन ते दोघेही त्यांची फसवणुक करुन पळून गेले होते. हा प्रकार लक्षात येताच विकास खांतेवडा यांनी कांदिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपींविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रोहित सोनगरा आणि आकांक्षा तिवारी या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु होता.
ही शोधमोहीम सुरु असतानाच तीन दिवसांपूर्वी आकांक्षा हिला पोलिसांनी अटक केली. चौकशीत तिने रोहितच्या मदतीने ही फसवणुक केल्याची कबुली दिली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होणार असल्याचे पोसिांकडून सांगण्यत आले.