रेल्वेत नोकरीच्या आमिषाने पाचजणांची 50 लाखांची फसवणुक

रेल्वेच्या तोतया बड्या अधिकार्‍याला उलवे येथून अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 नोव्हेंबर 2025
मुंबई, – भारतीय रेल्वेत कमर्शियल क्लार्क पदासाठी भरती असल्याची बतावणी करुन पाचजणांची नोकरीच्या आमिषाने 50 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी एका भामट्याला आरसीएफ पोलिसांनी अटक केली. राहुल बिनूप्रसाद दिप ऊर्फ राहुल दिप असे या 43 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याने स्वतला मध्य रेल्वेचा बडा अधिकारी असल्याची बतावणी केली होती. फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. अखेर त्याला अकरा महिन्यानंतर नवी मुंबईतील उलवे परिसरातून पोलिसांनी शिताफीने अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रुपेश अनिल क्षीरसागर हा चेंबूरच्या माहुल रोड, प्रदीप गावंड हाऊसमध्ये राहतो. तीन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी भायखळा येथे एक हॉटेल भाड्याने चालविण्यासाठी घेतला होता. तिथे रुपेश हा त्याची पत्नी अक्षदा, भाऊ निखीलसोबत काम पाहत होता. याच हॉटैलमध्ये शिवाजी भाऊसाहेब मोहिते हा नियमित येत होता. त्याने तो मूळचा पुण्याचा रहिवाशी असून व्यवसायाने बिल्डर असल्याचे सांगितले होते. अनेकदा चर्चेदरम्यान त्याने त्याला त्याची शासकीय अधिकार्‍यांशी चांगले संबंध असल्याचे सांगून काही गरजू बेरोजगार तरुण असतील तर त्यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देतो असे सांगितले होते. रुपेशसह निखील यांनी सरकारी नोकरीसाठी बरेच प्रयत्न केले होते, मात्र त्यांना नोकरी मिळाली नव्हती. त्यामुळे त्याने त्याला त्याच्यासह भाऊ व पत्नीसाठी रेल्वेमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. यावेळी त्याने रुपेशचा मोबाईल क्रमांक घेतला होता.

काही दिवसांनी त्यांना हॉटेलमध्ये प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांनी हॉटेलचा व्यवसाय बंद केला होता. याच दरम्यान शिवाजी हा त्यांच्या घरी आला होता. त्याने रेल्वे खात्यात कमर्शियल क्लार्क म्हणून काही जागा रिक्त आहेत तिथे पाच ते सहाजणांना नोकरीचे देण्याचे आश्वासन दिले होते. नोकरी हमखास मिळेल पण प्रत्येक उमेदवारामागे दहा लाख खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. त्याला त्यांनी होकार दर्शविला होता. त्यानंतर रुपेशसह निखील आणि अक्षदा यांनी कमर्शियल क्लार्कसाठी त्याच्याकडे त्यांचे शैक्षणिकसह इतर कागदपत्रे दिली होती. यावेळी रुपेशने त्याच्या परिचित गणेश साहेबराव नरवडे आणि जान्हवी जगन्नाथ हंकारे यांचे अर्ज दिले होते. नोकरीसाठी त्यांनी त्याला टप्याटप्याने 50 लाख रुपये दिले होते. त्यानंतर शिवाजीने त्यांची ओळख राहुल दिपशी करुन दिली होती. राहुल हा रेल्वेतील एक बडा अधिकारी असून तोच त्यांच्या नोकरीचे काम करणार असल्याचे सांगितले होते.

काही महिन्यानंतर त्यांना त्यांची कमर्शियल क्लार्कसाठी नियुक्ती झाल्याचे रेल्वेच्या लोगोसह सहीचे पत्र देण्यात आले होते. याच पत्रात त्यांना प्रशिक्षणासाठी बोलाविण्यात आले होते. त्यांना वेगवेगळ्या लोकल रेल्वे स्थानकावर प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. मात्र तिथे कोणीही व्यक्ती त्यांना मार्गदर्शनासाठी येत नव्हता. याबाबत विचारणा केल्यानंतर ते दोघेही वेगवेगळे कारण सांगत होते. काही दिवसांनी त्यांनी त्यांना मुंबईऐवजी कोलकाता रेल्वे कोट्यातून काम करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्या सर्वांना हावडा येथे बोलाविण्यात आले होते. तिथे त्यांची रेल्वेच्या नोकरीसाठी फॉर्म भरुन घेण्यात आले. नंतर त्यांची परिक्षा घेण्यातआली होती.

याच परिक्षेत त्यांना प्रश्नपत्रिकासह उत्तरपत्रिका देण्यात आली होती. परिक्षेनंतर त्यांची मेडीकल करण्यात आली. त्यानंतर त्यांना एक महिन्यांत पोस्टिंग मिळेल असे सांगणत आले. 2 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांना पोस्टाने एक पत्र प्राप्त झाले होते. त्यात त्यांना जॉयनिंगसाठी कोलकाता येथे बोलाविण्यात आले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना ओरिसा येथे पाठविण्यात आले. मात्र त्यांना सेवेत सामावून घेण्यात आले होते. शिवाजी मोहिते आणि राहुल दिप यांच्याकडून सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणुक होत असल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले होते.

घडलेला प्रकार त्यांनी आरसीएफ पोलिसांना सांगून या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून भारतीय रेल्वे खात्यात नोकरी मिळाल्याचे सांगून नोकरीसाठी घेतलेल्या 50 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच शिवाजी मोहितेला पोलिसांनी अटक केली होती तर राहुल दिप हा पळून गेला होता. त्याचा गेल्या अठरा महिन्यांपासून पोलिसांकडून शोध सुरु होता.

ही शोधमोहीमस सुरु असताना राहुल दिप हा नवी मुंबईतील उलवे परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त कलीम खान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश खपाले, अजय गोल्हर, पोलीस हवालदार राणे, वीर, पोलीस शिपाई काकडे, खटके, भावसार, महिला पोलीस शिपाई नाईक यांनी उलवे येथून राहुल दिपला ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक करुन लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे. या टोळीने आतापर्यंत रेल्वे खात्यात नोकरीच्या आमिषाने किती उमेदवारांची फसवणुक केली होती. त्यांच्याकडून किती रुपये घेतले होते, ही रक्कम कुठे गुंतवणुक केली आहे याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. या गुन्ह्यांचा पोलीस उपनिरीक्षक रमेश खपाले हे तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page