पैशांचा पाऊस पाडतो सांगून गंडा घालणार्‍या दोघांना अटक

गुजरात येथून दोन भामट्यांना अटक तर इतरांचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 डिसेंबर 2025
मुंबई, – आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका व्यावसायिकाला पैशांचा पाऊस पाडतो असे सांगून गंडा घालणार्‍या एका टोळीचा सांताक्रुज पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत दोन भामट्यांना पोलिसांनी गुजरात येथून अटक केली आहे. इलियास करीम मुसानी आणि सोहिलभाई जिगरभाई शेख अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे गुजरातचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने पैशांचा पाऊस पाडतो असे सांगून इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

मांगीलाल मोदीराम दावे हे 76 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार सांताक्रुज येथील जुहू तारा रोड, इंदिरानगर परिसरात राहतात. त्यांची स्वतची एक दूध डेअरी असून ती डेअरी त्यांची पत्नी कमला हिच्या नावावर रजिस्ट्रर आहे. गेल्या दोन वर्षांपासून कमला या आजारी होत्या. पत्नीच्या उपचारासाठी त्यांनी ती दूध डेअरी एका व्यक्तीकडून दोन लाख रुपये घेऊन चालविण्यासाठी दिली होती. तसेच त्यांनी त्यांचा एक रुम तीन लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर एका व्यक्तीला भाड्याने दिले होते. ही सर्व रक्कम त्यांनी त्यांच्या पत्नीच्या औषधोपचारावर खर्च केला होता. तरीही त्यांच्या पत्नीचे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. राहत्या गावी सर्व अंतविधी केल्यानंतर ते मुंबईत आले होते. पत्नीच्या औषधोपचारामुळे त्यांच्यावर प्रचंड कर्ज झाले होते.

याच दरम्यान त्यांची ओळख खान साहब या व्यक्तीशी झाली होती. त्यांनी त्याला त्यांची आर्थिक अडचण सांगितली. यावेळी त्याने त्याचे मामा-भाचा साहिल आणि इम्रान हे दोघांबाबत माहिती दिली. ते दोघेही पैशांचा पाऊस पाडून त्यांची सर्व आर्थिक अडचण दूर करतील असे सांगितले होते. त्यामुळे ते या दोघांकडे गेले होते. यावेळी त्याने कपड्यातून काही पैसे काढून त्यांना दिले. त्यांच्यावर विश्वास बसल्याने त्यांनी त्यांच्याकडे त्यांची आर्थिक अडचण दूर करण्याची विनंती केली होती. यावेळी त्यांनी त्यांना पूजेचे काही साहित्य आणि काही कॅश घेऊन आणण्यासाठी सांगितले.

25 ऑक्टोंबर 2025 रोजी ठरल्याप्रमाणे ते सर्वजण जुहू चौपाटीवर आले होते. तिथे त्यांनी त्यांच्याकडील दिड लाख रुपये घेतले. तिथे पूजा केल्यानंतर त्यांच्या हातात एक बॅग दिली होती. त्यानंतर ते दोघेही तेथून निघून गेली. घरी आल्यानंतर त्यांनी बॅग उघडली असता त्यात पाचशे आणि दोनशे रुपयांच्या भारतीय मनोरंजन बँक आणि भारतीय बच्चों का बँक असलेल्या नोटा होत्या. पैशांची पाऊस पाडतो असे सांगून या दोघांनी त्यांची फसवणुक करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सांताक्रुज पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित् आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

या घटनेची अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती पंडित यांनी गंभीर दखल घेत सांताक्रुज पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कल्हाटकर, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पवार, पोलीस हवालदार नितीन केणी, पोलीस शिपाई नरेंद्र हिरेमठ, तेजेस मानेख आनंदा दिवाणजी यांनी तपास सुरु केला होता.

सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांतील आरोपी गुजरातला पळून गेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर या पथकाने गुजरातच्या बोटाद टाऊन परिसरातून इलियास आणि सोहिलभाई या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच ही फसवणुक केल्याची कबुली दिली. त्यानंतर या दोघांनाही अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. त्यांची पोलिसाकडून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून फसवणुकीची रक्कम लवकरच हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page