मशिनऐवजी प्लायवूडसह कार्डबोर्ड पाठवून महिलेची फसवणुक
मशिनसाठी घेतलेल्या पैशांचा अपहारप्रकरणी आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 डिसेंबर 2025
मुंबई, – सुमारे सोळा लाख रुपयांच्या कोलॉन हायड्रो थेरपी आणि इंफ्रारेड सोना या मशिनऐवजी बॉक्समध्ये प्लायवूड आणि कार्डबोर्ड असलेले खोके पाठवून एका भामट्याने व्यावसायिक महिलेची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोगस दस्तावेज सादर करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच निशांत भानुभाई मेहता या भामट्याला मालाड पोलिसांनी अटक केली. मूळचा गुजरातचा रहिवाशी असलेला निशांत हा फसवणुकीच्या गुन्ह्यांत सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रिती तेजेस पवार ही महिला अंधेरीतील आंबोली परिसरात राहत असून तिचा मेडीकल डिव्हायसेसचा व्यवसाय आहे. मालाड येथील गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, क्रिया शोरुमसमोरील ब्लू ऑरबीटमध्ये तिला एक मेडीकल सेंटर सुरु करायचे होते. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. या मेडीकल सेंटरसाठी तिला कोलॉन हायड्रो थेरपी आणि इंफ्रारेड सोना या ट्रिटमेटसाठी अत्याधुनिक मशिनची गरज होती. या दोन्ही मशिन गुजरातच्या नेक्सॉर्थ ऑर्थेपेडिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे उपलब्ध असल्याची माहिती तिला समजली होती. त्यामुळे तिच्यासह तिचा पती तेजेस पवार यांनी कंपनीच्या वेबसाईटवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. यावेळी निशांत मेहता याने त्यांना दोन्ही मशिनची माहिती देताना त्यांना आगाऊ रक्कम बुकींगसाठी जमा करण्यास सांगितले होते.
याच दरम्यान तेजेस पवार यांचा बडोदा येथे राहणार्या संदीप पटालिया यांनी संबंधित कंपनीत जाऊन मशिनची पाहणी करुन तंना फोटो आणि व्हिडीओ पाठविले होते. कंपनीकडे मशिन असल्याची खात्री होताच तिने तिने बॅकेत कर्जासाठी अर्ज केला होता. यावेळी तिने कंपनीकडून मशिनचे कोटेशन घेतले होते. प्रोजेक्ट रिपोर्ट सादर केल्यानंतर तिला बँकेने सात लाखांचे कर्ज मंजूर केले होते. नोव्हेंबर महिन्यांत निशांत मेहताने तिला संपर्क साधून मशिनचे पेमेंट तातडीने करा नाहीतर मशिनची दुसर्या व्यक्तीला विक्री करु असे सांगितले होते. त्यामुळे तिने कंपनीला उर्वरित पेमेंट केले होते, मात्र कंपनीने त्यांना मशिन पाठविले होते. मशिन घेऊन जाणार्या गाडीचा अपघात झाल्याचे सांगून त्यांना काही दिवस थांबण्याची विनंती केली होती.
मात्र दिलेल्या मुदतीत त्याने मशिन पाठविले नाही. त्यामुळे तिने त्याच्याकडे पैशांची मागणी केलीद होती. यावेळी त्याने तिच्या बँक खात्यात पाठविलेल्या पैशांची बँकेची स्लिप पाठविली होती. मात्र बँकेची ती स्लिप बोगस असल्याचे तिच्या लक्षात आले. त्याने त्यांना एक धनादेश दिला, मात्र हा धनादेश बॅकेत न वटता परत आला. 19 नोव्हेंबरला निशांत मेहताने तिला कॉल करुन तो स्वता कोलॉन हायड्रो मशिन घेऊन येत असून ती मशिन इंस्ट्राल करुन देतो असे सांगितले.
ठरल्याप्रमाणे निशांत 3 डिसेंबरला मशिन घेऊन आला, मात्र त्याने मशिन इंस्ट्राल करुन दिली नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने बॉक्स ओपन करुन मशिनची पाहणी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिला मशिनमध्ये कमर्शियल प्लायवुड आणि कार्डबोर्डचे खोके असल्याचे दिसू आले. हा प्रकार पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला होता. निशांत मेहताने मशिनऐवजी प्लायवूड आणि कार्डबोर्डचे खोके पाठवून मशिनसाठी दिलेल्या 16 लाख 22 हजार 450 रुपयांचा अपहार करुन फसवणुक केली होती. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच निशांत मेहता याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात निशांत पटेल हा निशांत हा गुजरातच्या राजकोट, देवदिप दामजी मेपा रोड, भक्तीनगर परिसरात राहतो. त्याची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.