सोन्याच्या दागिन्यांचा अपहारप्रकरणी कारागिराला अटक

गुन्हा दाखल होताच गेल्या दिड वर्षांपासून वॉण्टेड होता

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 एप्रिल 2026
मुंबई, – दुरुस्तीसह दागिने बनविण्यासाठी दिलेल्या साडेसहा लाखांचा दागिन्यांचा अपहा करुन पळून गेलेल्या एका कारागिराला बोरिवली पोलिसांनी अटक केली. कुर्बान भानू मंडल असे या कारागिराचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच कुर्बान हा पळून गेला होता, अखेर दिड वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मनोहर कस्तुरचंद सोनी हे ज्वेलर्स व्यापारी असून ते सध्या बोरिवलीतील गोराई परिसरात राहतात. त्यांचा मनोहर ज्वेलर्स नावाचे एक शॉप असून त्यांचा सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीसह सोन्याचे बनविण्याचा व्यवसाय आहे. कुर्बान हा त्यांचा परिचित कारागिर असून अनेकांना ते त्याला सोने देऊन दागिने बनवून घेत होते. कुर्बान कामाला हुशार होता, त्यामुळे त्यांनी दिलेल्या ऑर्डरप्रमाणे कुर्बानने दागिने बनवून दिले होते. त्याच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. ऑक्टोंबर 2024 रोजी त्यांनी त्याला काही जुने दागिने दुरुस्तीसह दागिने बनविण्यासाठी दिले होते. या कामासाठी त्यांनी 50 हजार रुपयांचे पेमेंटही केले होते.

चार दिवसांत दागिने बनवून आणि दुरुस्ती करुन देतो असे कुर्बानने सांगितले होते. मात्र त्याने त्यांना दागिने दिले नाही. कॉल केल्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे मनोहर सोनी हे गोराईतील त्याच्या रुममध्ये गेले होते. मात्र त्यांना तो तिथे सापडला नाही. चौकशीदरम्यान त्यांच्यासह प्रविण बाबूला सोनी, अभिजीत रमेश गुहागरकर आणि रत्नाकर नारायण एकबोटे यांनीही त्याला दुरुस्तीसाठी दागिने दिले होते. त्याने त्यांनाही दागिने परत केले नव्हते. सुमारे साडेसहा लाखांचे दागिने आणि पन्नास हजाराची कॅश घेऊन कुर्बान हा पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात कुर्बान मंडलविरुद्ध बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी कुर्बानविरुद्ध सोन्याच्या दागिन्यांसह पैशांचा अपहारासह फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या अटकेसाठी बोरिवली पोलिसांनी एक टिम त्याच्या राहत्या गावी गेली होती. मात्र तो तेथून पळून गेला होता. गेल्या दिड वर्षांपासून त्याचा पोलिसांनी शोध सुरु होता. मात्र प्रत्येक वेळेस तो पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. अखेर दोन दिवसांपूर्वी कुर्बान मंडल याला पोलिसांनी अटक केली.

चौकशीत त्यांनीच तक्रारदारासह इतर तिघांच्या दागिन्यांचा अपहार केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे. कुर्बानने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page