कार्पोरेट कंपनीत कॅण्टींग सर्व्हिस सुरु करण्याचे आमिषाने फसवणुक

फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 मे 2025
मुंबई, – कार्पोरेट कंपनीत कॅण्टींग सर्व्हिस सुरु करण्याचे कॉन्ट्रक्ट मिळवून देतो असे सांगून कंपनीचे बोगस मंजुरीपत्राचे कागदपत्रे देऊन दोन व्यावसायिक मित्रांची साडेअठरा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी युसूफ मोहसीन मिर्झा या 42 वर्षांच्या आरोपीस गोरेगाव पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल होताच युसूफ हा गेल्या एक वर्षांपासून फरार होता, अखेर त्याला एक वर्षांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

विनयमूर्ती विनायगम आदित्रावीडर हे गोरेगाव येथे राहत असून एका खाजगी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात. राकेश हिरे हा त्यांचा बालपणीचा मित्र असून तो गोरेगाव येथील मिठानगर परिसरात राहतो. काही वर्षांपूर्वी त्यांनी राकेशसोबत जोगेश्वरी येथे इडली, डोसा व सांबर विक्रीचा व्यवसाय सुरु होता. तिथे संतोष गुप्ता हा नास्ता करण्यासाठी येत होता. त्यातून त्यांची चांगली ओळख झाली होती. 2018 साली त्याने त्यांना युसूफ मिर्झाविषयी माहिती सांगितली होती. युसूफ हा त्याचा मित्र असून त्याची मोठमोठ्या कार्पोरेट कंपनीत ओळख आहेत. तो त्यांना संबंधित कार्पोरेट कंपनीत कॅटींग सर्व्हिस सुरु करण्यास तसेच चहा, स्नॅक्स, डोसा आणि इतर खाद्यपदार्थाचे काऊंटर सुरु करण्यास मदत करेल असे सांगितले होते.

त्याचा प्रपोजल चांगला वाटल्याने त्यांनी कॅटींग सर्व्हिस सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी त्याने त्यांना काही खाजगी कार्पोरेट कंपन्यांचे प्रपोजल दिले होते. ते कॉन्ट्रक्ट मिळवून देण्यासाठी काही पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला टप्याटप्याने साडेअठरा लाख रुपये दिले होते. मात्र कोरोनामुळे त्यांचे काम पूर्ण झाले नव्हते. कोरोनानंतर काही त्रुटी काढून तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. काही महिन्यानंतर त्याने त्यांना एका मल्टिनॅशनल कंपनीत सहा स्टॉलचे कॉन्ट्रक्ट मिळवून देतो असे सांगितले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने जे. पी मॉर्गन कंपनीचे मंजुरीच्या कॉन्ट्रक्टचे काही दस्तावेज दिले होते.

मात्र दिलेल्या मुदतीत त्याने कॉन्ट्रक्टही त्यांना मिळवून दिले नाही. त्याने दिलेल्या कॉन्ट्रक्टच्य कागदपत्रांची शहानिशा केली असता ते सर्व कागदपत्रे बोगस होती. संंबंधित कंपनीने युसूफ मिर्झाला ओळखत नाही, त्याला कुठले कॉन्ट्रक्ट दिले नसल्याचे सांगितले. अशा प्रकारे युसूफ मिर्झाने डिसेंबर 2018 ते जून 2024 या कालावधीत काही खाजगी कार्पोरेट कंपनीत कॅण्टीन सर्व्हिस सुरु करण्यास मदत करतो असे सांगून त्यांच्याकडून साडेअठरा लाख रुपये घेतले होते, मात्र कॅण्टींग सर्व्हिसचे कॉन्ट्रक्ट मिळवून दिले नाही. त्याच्याकडून काम होत नसल्याने त्यांनी युसूफ मिर्झाकडे कामासाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती.

मात्र पैसे न देता पळून गेला होता. त्यामुळे विनयमूर्ती यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात युसूफ मिर्झाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून साडेअठरा लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत तो गेल्या एक वर्षांपासून फरार होता. अखेर त्याला दोन दिवसांपूर्वी गोरेगाव पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page