हिर्‍यांचा अपहारप्रकरणी वॉण्टेड पिता-पूत्राला अटक

1.93 कोटींच्या हिर्‍यांचा अपहार केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 जून 2025
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या 1 कोटी 93 लाख रुपयांच्या हिर्‍यांचा अपहार करुन एका हिरे व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या पिता-पूत्राला अखेर बीकेसी पोलिसांनी अटक केली. किशोर नरसीभाई अभांगी आणि मौलिक किशोर अभांगी अशी या दोघांची नावे आहेत. फसवणकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्‍यांची फसवणुक केली आहे का याचा तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

ताडदेवचे रहिवाशी असलेले प्रियांक महेंद्रकुमार शाह हे हिरे व्यावसायिक असून त्यांच्या मालकीची के. आरीन ज्वेल्स नावाची एक कंपनी आहे. त्यांचा भाऊ सुदीप शाह हादेखील हिरे व्यावसायिक असून त्याची आर्यन इम्पेक्स नावाची एक कंपनी आहे. या दोघांचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून त्यांच्या कंपनीचे कार्यालय वांद्रे येथील बीकेसी भारत डायमंड बोर्स परिसरात आहे. याच ठिकाणी किशोर लिंबासिया हे हिरे दलाल म्हणून काम करत असून गेल्या पाच वर्षांपासून ते एकमेकांच्या परिचित आहेत.

सप्टेंबर 2024 रोजी त्यांनीच त्यांची ओळख हिरे व्यावसायिक असलेले किशोर अभांगी याच्यासोबत करुन दिली होती. त्याची पार्थ डायमंड नावाची एक कंपनी आहे. त्याचे बीकेसीसह गुजरात येथील सुरत शहरात मुख्य कार्यालय आहे. ते दोघेही एकाच व्यवसायाशी संबंधित असल्याने त्यांची काही दिवसांत चांगली मैत्री झाली होती. 18 सप्टेंबर 2024 रोजी किशोर लिंबासिया हे किशोर अभांगी आणि मौलिक अभांगी याच्यासोबत त्यांच्या कार्यालयात आले होते. यावेळी या दोघांनी त्यांना त्यांच्याकडे हिरे खरेदी करणारी एक चांगली ग्राहक कंपनी आहे. त्यांना चांगल्या प्रतीच्या हिर्‍यांची गरज आहे. त्यामुळे किशोर लिंबासिया यांनी त्यांच्या गॅरंटीवर या दोघांनाही क्रेडिटवर हिरे देण्याची विनंती केली होती.

त्यांच्यासोत प्रियांक शाह यांनी अनेकदा हिर्‍यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी पार्थ कंपनीचे दोन्ही संचालक व्यावसायिक किशोर अभांगी आणि मौलिक अभांगी यांना 1 कोटी 93 लाख रुपयांचे 459 कॅरेटचे हिरे क्रेडिटवर दिले होते. दोन ते चार दिवसांत व्यवहाराची माहिती देतो असे सांगून ते दोघेही निघून गेले होते. एक आठवड्यानंतर त्यांनी या दोघांनाही कॉल केला असता त्यांनी ग्राहकाला हिरे दाखविले असून त्यांच्यात लवकरच व्यवहार पूर्ण होणार असल्याचे सांगितले.

मात्र एक महिना उलटूनही त्यांनी त्यांना त्यांच्यातील व्यवहाराची माहिती सांगितली नव्हत. त्यामुळे ते त्यांच्या बीकेसी येथील कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांचे कार्यालय बंद होते. त्यांनी किशोर लिंबासिया यांच्याकडे चौकशी केली असता ते दोघेही काही दिवसांपासून त्यांच्या कार्यालयात येत नसल्याचे समजले. मोबाईल बंद असल्याने त्यांचा संपर्क होत नव्हता. ते दोघेही हिरे घेऊन पळून गेले होते. ग्राहकांना हिरे दाखविण्यासाठी घेतलेल्या 1 कोटी 92 लाख रुपयांच्या हिर्‍यांचा अपहार करुन या पिता-पूत्रांनी त्यांची फसवणुक केल्याचे लक्षात येताच त्यांनी बीकेसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी पिता-पूत्राविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर किशोर अभांगी आणि मौलिक अभांगी या दोघांविरुद्ध पोलिसांनी हिर्‍यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. गेल्या सात महिन्यांपासून ते दोघेही पोलिसांना सतत गुंगारा देत होते. अखेर पळून गेलेल्या या दोन्ही पिता-पूत्राला बीकेसी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page