मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 सप्टेंबर 2025
मुंबई, – बोगस दस्तावेज बनवून फसवणुक केल्याच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस 21 वर्षांनी एन. एम जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली. संतोष हिराचंद जैन असे या 50 वर्षीय आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्यावर बोगस दस्तावेज बनवून बोगस डिमॅट उघडून 22 हून शेअरधारकांची शेअरची विक्री करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता, अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
कश्यप चोखावाटिया हे तक्रारदार असून ते एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या कंपनीचे बोगस डिमॅट उघडून संतोष जैनसह इतर आरोपींनी बोगस दस्तावेज बनवून 22 हून अधिक शेअरधारकांचे शेअर चोरी करुन त्याची परस्पर विक्री केली होती. या शेअर विक्रीमुळे तक्रारदारासह इतरांची सव्वानऊ लाखांची फसवणुक झाली होती. हा प्रकार उघडकीस येताच कश्यप चोखावाटिया यांनी 2004 साली एन. एम जोशी मार्ग पोलिसांत संतोष जैनसह इतर आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध बोगस दस्तावेज बनविणे, बोगस डिमॅट उघडून शेअरची विक्री करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून चार आरोपींना अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीतून या संपूर्ण कटात संतोष जैन याने महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे उघडकीस आले होते. मात्र या घटनेनंतर तो पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता.
गेल्या 21 वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. तरीही पोलिसांनी त्याचा शोध सुरुच ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असताना संतोष जैन हा मिरारोड येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने संतोष जैन याला मिरारोड येथून अटक केली. चौकशीत तोच या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.