गुंतवणुकीच्या बहाण्याने एकाच कुटुंबातील तिघांची फसवणुक
एक कोटीच्या फसवणुकीप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 एप्रिल 2025
मुंबई, – गुंतवणुकीच्या बहाण्याने एकाच कुटुंबातील तिघांची त्यांच्याच परिचित जोडप्याने सुमारे एक कोटीची फसवणुक केल्याचा प्रकार लोअर परेल परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भक्ती अक्षय कांडरकर आणि अक्षय लक्ष्मण कांडरकर या आरोपी पती-पत्नीविरुद्ध एन. एम जोशी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या जोडप्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते.
नयना मंगेश देवळेकर ही 49 वर्षांची महिला तिचे पती मंगेश, मुलगी शेफाली आणि मुलगा शंतनू यांच्यासोबत लोअर परेल येथील सनमील कंपाऊंड लेन, भक्ती सागर अपार्टमेंटमध्ये राहते. पूर्वी ते सर्वजण सायन-प्रतिक्षानगरात राहत होते. तिथे त्यांच्या शेजारी भक्ती ही राहत होती. 25 वर्षांपूर्वी ते सर्वजण लोअर परेल येथे राहण्यासाठी आले होते. तेव्हपासून भक्तीशी तिचा कुठलाही संपर्क नव्हता. 2014 साली फेसबुकच्या माध्यमातून त्यांची भेट झाली होती. त्यानंतर त्या दोघीही एकमेकांच्या संपर्कात होते. याच दरम्यान भक्तीने ती मोतीवाल ओसवाल या एजन्सीमध्ये कामाला असल्याने सांगून या कंपनीचे अनेक आकर्षक योजना आहेत. त्यातील एका योजनेत एक लाखांची गुंतवणुक केल्यास तिला दहा टक्के परताव्यासह मूळ रक्कम मिळेल असे सांगून तिला या योजनेसह तिने तिला लोणावळा येथे अकरा गुंठे प्लॉटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होती.
भक्ती ही तिच्या परिचित तसेच तिच्यावर विश्वास असल्याने तिने 20 लाख रुपये, तिचे पती मंगेश यांनी 46 लाख 50 हजार तर मुलगी शेफाली हिने 40 लाख असे एक कोटी सहा लाख 50 हजाराची गुंतवणुक केली होती. इतकेच नव्हे तर तिने भक्ती आणि अक्षयच्या सांगण्यावरुन त्यांच्याकडे ोन मंगळसूत्र, सोन्याची चैन, दोन ब्रेसलेट, बांगड्या असे 149 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिनेही गुंतवणुक म्हणून दिले होते. मे 2021 आणि जानेवारी 2023 या कालावधीत हा संपूर्ण व्यवहार झाला होता. या गुंतवणुकीवर काही रक्कम परत करुन तिने त्यांचा विश्वास संपादन केला होता. मात्र व्याजासहीत मूळ रक्कम असे मिळून एक कोटी चार लाख रुपये परत केले नाही. अनेकदा विचारणा करुनही तिच्यासह तिचा पती तिला प्रतिसाद नव्हते.
गेल्या दोन वर्षांपासून ती तिच्याकडे सतत पाठपुरावा करत होती. मात्र तिने तिला तिचे पैसे किंवा दागिने परत केले नाही. आकर्षक व्याजासह लोणावळा येथील अकरा गुंठे प्लॉट गुंतवणुकीवर घेतलेल्या पैशांचा अपहार करुन या दोघांनी देवळेकर कुटुंबियांच्या तिघांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच नयना देवळेकर हिने एन. एम जोशी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर भक्ती कांडरकर आणि अक्षय कांडरकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्यांच्या अटकेनंतर त्यांनी अशाच प्रकारे इतरांना गुंतवणुकीच्या नावाने गंडा घातला आहे का याचा पोलीस तपास करणार आहे.