फसवणुकीच्या गुन्ह्यांत बडतर्फ पोलिसाला अटक

कारवाई सुरु असताना फसवणुकीचा धंदा सुरु होता

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ जानेवारी २०२५
मुंबई, – कारवाईच्या नावाने एका पान टपरी चालकाची फसवणुक केल्याप्रकरणी उत्तम केशव मोरे या बडतर्फ पोलीस कर्मचार्‍याला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उत्तमला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून तो कारवाई सुरु असताना अशाच प्रकारे फसवणुकीचे धंदे करत होता. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अशाच काही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील यांनी सांगितले.

सुरेश रामदेव बराई हे महालक्ष्मी मंदिर कंपाऊंड परिसरात राहत असून त्यांचा आझाद मैदानजवळ पान टपरी आहे. ३० डिसेंबरला रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या दुकानात उत्तम मोरे आला आणि त्याने तो पोलीस असल्याचे सांगून त्याच्याकडे पान टपरी चालविण्याचा परवाना आहे का अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्याचा बहाणा करुन टॅक्सीत बसविले. भायखळा येथे आणल्यानंतर त्याने त्यांना जीपेद्वारे ८ हजार ४०० ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर तो पळून गेला होता. घडलेला प्रकार त्याने आझाद मैदान पोलिसांना सांगून संंबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.

याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त प्रविण मंढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलिमा कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील, पोलीस उपनिरीक्षक अरुण गायकवाड, पोलीस हवालदार कटरे, पोलीस शिपाई मुंढे, किर्तकर, माने, गोपीनाथ पाटील यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पळून गेलेल्या उत्तम मोरे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले. उत्तम मोरे हा बडतर्फ पोलीस कर्मचारी आहे. त्याच्यावर बडतर्फीची कारवाई असताना तो अनेकाना पोलीस असल्याचे सांगून खंडणी वसुली करत होता. त्यांची फसवणुक करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तो अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध गुन्हे शाखेसह दहिसर, माटुंगा पोलीस ठाण्यात रॉबरीसह पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुक करणे आदी गुन्ह्यांची नोंद असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील यांनी सांगितले. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page