तिप्पट रक्कमेचे आमिष दाखवून महिलेवर लैगिंक अत्याचार
फसवणुकीसह लैगिंक अत्याचारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ डिसेंबर २०२४
मुंबई, – तिप्पट रक्कमेचे आमिष दाखवून एका ३६ वर्षांच्या विवाहीत महिलेची फसवणुक करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी दोन आरोपीविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुस्ताक आणि इर्शाद अशी या दोघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध फसवणुकीसह लैगिंक अत्याचार, मारहाण करणे आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांत दोघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
३६ वर्षांची विवाहीत महिला तिच्या पतीसह मुलांसोबत कुर्ला परिसरात राहते. इर्शाद आणि मुस्ताक हे तिच्या परिचित आहेत. ऑक्टोंबर २०२० रोजी या दोघांनी तिचा विश्वास संपादन करुन एका योजनेत गुंतवणुक करण्यास सांगितले होते. गुंतवणुकीची ही रक्कम तिप्पट करुन देतो असे सांगून तिच्याकडून काही सोन्याचे दागिने घेतले होते. ते दागिने गहाण ठेवून त्याने तिच्याकडून ३ लाख ७० हजार रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत तिला तिप्पट रक्कम दिली नाही. विचारणा केल्यानंतर ते दोघेही तिला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. तसेच तिच्या पती आणि मुलांना जिवे मारण्याची धमकी देत होते. तिला जबदस्तीने कपडे काढण्यास प्रवृत्त करुन तिचे अश्लील फोटो काढले होते. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन, तिला मारहाण करुन तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगितला तर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती.
३० ऑक्टोंबर २०२० ते ३० ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला होता. या दोघांकडून सुरु असलेल्या ब्लॅकमेलसह धमकीला तसेच फसवणुकीनंतर तिने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानतर तिने टिळकनगर पोलिसांत दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर इर्शाद आणि मुस्ताक या दोघांविरुद्ध पोलिसांनी ४२०, ३७६, ३२३, ५०६, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांवर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.