फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस दोन वर्षांनी अटक
शासकीय नोकरीसह फ्लॅटच्या आमिषाने गंडा घातला होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 सप्टेंबर 2025
मुंबई, – फसणवणुकीच्या गुन्ह्यांत गेल्या दोन वर्षांपासून सतत गुंगारा देणार्या एका वॉण्टेड आरोपीस समतानगर पोलिसांनी अटक केली. समीर सिताराम नाईक असे या 32 वर्षांच्या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. शासकीय नोकरीसह फ्लॅटच्या आमिषाने समीरने एका जोडप्याची सुमारे 54 लाखांची फसवणुक केल्याचा आरोप असल्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा चव्हाण यांनी सांगितले. समीरने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.
यातील तक्रारदार महिला ही तिच्या पतीसोबत कांदिवली परिसरात राहते. तीन वर्षांपूर्वी तिची समीरशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान समीरने तिला त्याचे अनेक शासकीय विभागात चांगली ओळख असल्याचे सांगून तिच्या पतीला मंत्रालयासह इतर शासकीस नोकरीचे आमिष दाखविले होते. शासकीय नोकरी मिळत असल्याने तिनेही तिच्या पतीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. याच नोकरीसाठी तिने समीरने आठ लाख तीस हजार रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने तिच्या पतीला नोकरी मिळवून दिली नाही. त्यामुळे तिने त्याच्याकडे नोकरीसाठी घेतलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगून त्याचा भाईंदर येथील फ्लॅट विक्रीतून तिला पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासनही त्याने पाळले नाही. त्यानंतर त्याने तिच्या नावावर फ्लॅट करण्याचे तसेचगृहकर्जासाठी मदत करतो असेही सांगितले होते.
बँकेच्या गृहकर्ज प्रोसेजरसह इतर कामासाठी तिच्याकडून 46 लाख 19 हजार रुपये घेतले. शासकीय नोकरीसह फ्लॅटसाठी त्याने तक्रारदार महिलेसह तिच्या पतीकडून टप्याटप्याने 54 लाख 49 हजार रुपये घेतले होते. मात्र नोकरी न देता तसेच फ्लॅटचा ताबा न देता त्यांची फसवणुक केली होती. पैशांची मागणी केल्यानंतर त्याने त्यांना धमकी देण्यास सुरुवात केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा चव्हाण यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशावरुन समीर नाईक याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.
गुन्हा दाखल होताच समीर हा पळून गेला होता. गेल्या दोन वर्षांपासून तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. तरीही त्याचा पोलिसांनी शोध सुरु ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असताना समीर नाईक हा सिंधुदुर्ग येथील कुडाळच्या गावी लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा चव्हाण, गंगापूरकर व अन्य पोलीस पथकाने त्याला कुडाळ येथील गावातून शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा चव्हाण या करत आहेत.