मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 डिसेंबर 2025
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड मुख्य आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. जितेंद्र सुखलाल राठोड असे या 53 वर्षांचे आरोपीचे नाव असून तो फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईसह वसईतील विविध पोलीस ठाण्यात आठहून अधिक अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होताच तो पळून गेला होता. गेल्या काही वर्षांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत त्याला शुक्रवारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे.
सारा जोखीम फर्नाडिस ही 50 महिला माझगाव येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तेरा वर्षांपूर्वी तिची बेला डिसुझा या महिलेशी ओळख झाली होती. या ओळखीत बेलाने तिला तिची म्हाडामध्ये ओळख असून तिला म्हाडाचे स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले होते. या आमिषाला बळी पडून सारा फर्नाडिससह इतर काही लोकांनी बेला डिसुझा हिच्याकडे म्हाडाच्या घरासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. यावेळी तिने सर्वांना म्हाडाचे फ्लॅट देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून 2012 ते 2019 या कालावधीत सुमारे सत्तर लाखांपेक्षा अधिक अधिक कॅश आणि बँक खात्यात प्राप्त केले होते. मात्र कोणालाही म्हाडाचा फ्लॅट दिला नाही. तिने म्हाडाचे दिलेले सर्व दस्तावेज बोगस असल्याचे नंतर उघडकीस आले होते.
हा प्रकार उघडकीस येताच सारा फर्नाडिससह इतरांनी बेला डिसुझा हिच्याविरुद्ध शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्याविरुद्ध म्हाडाचे बोगस वाटप पत्रासह इतर दस्तावेज बनवून फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेलाविरुद्ध अशाच प्रकारे इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याने त्या सर्व गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविणयात आला होता. या सर्व गुन्ह्यांत बेलाने अनेकांना म्हाडाच्या फ्लॅटच्या आमिषाने दोन कोटीपेक्षा अधिक रक्कम घेऊन गंडा घातल्याचे उघडकीस आले होते. याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली होती.
तिच्या चौकशीत जितेंद्र राठोड याचे नाव समोर आले होते. मात्र गुन्हा दाखल होताच तो अकरा वर्षांपासून फरार होता. त्याच्या अटकेसाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. ही शोधमोहीम ुसरु असताना जितेंद्र राठोड हा चेंबूर येथील सदगुरु हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण देवरे, नितीन पवार, पोलीस हवालदार मंदार राणे, जयेश अत्तरदे यांनी सदगुरु हॉटेल परिसरातून जितेंद्र राठोड याला ताब्यात घेतले.
चौकशीत फसवणुकीच्या गुन्ह्यांतील तोच वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. जितेंद्र हा बेला डिसुझाच्या लहान बहिणीचा पती आहे. बेलाच्या अटकेनंतर तिने जितेंद्र यानेच ही फसवणुक केल्याचा आरोप करुन फसवणुकीनंतर तो पळून गेल्याचे पोलिसांना सांगितले. ती जितेंद्रवर आरोप करुन पोलिसांची दिशाभूल करत होती. फसवणुकीच्या गुन्ह्यांत तो सराईत गुन्हेगार असून तयाच्याविरुद्ध 2022 साली वनराई, समतानगर, 2023 साली जुहू, 2024 साली शिवाजी पार्क, दादर, वसईच्या आचोले आणि माणिकपूर, 2025 साली दिडोंशी पोलीस ठाण्यात आठहून अधिक अपहारासह फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते.
गुन्हे दाखल होताच तो पळून गेला होता. गेल्या अकरा वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. अखेर अकरा वर्षांनी जितेंद्रला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत त्याला शुक्रवारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. जितेंद्र राठोडकडून फसवणुक झालेल्या लोकांनी आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.