फ्लॅटच्या 26 लाखांचा अपहारप्रकरणी भामट्याला अटक

सहआरोपी असलेल्या पत्नीलाही लवकरच अटक होणार

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 मे 2025
मुंबई, – फ्लॅटसाठी दिलेल्या सुमारे 26 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी अमजद अन्वरअली सौदागर या भामट्याला मालवणी पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत त्याची पत्नी आफशा अमजद सौदागर ही सहआरोपी असून तिला लवकरच या गुन्ह्यांत अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन अहमदने तोच फ्लॅट स्वतच्या पत्नीला गिफ्ट डिड करुन रजिस्ट्रेशन करुन तक्रारदाराची फसवणुक केल्याचा आरोप आहे.

रमेश दामू सरोदे हे रिक्षाचालक असून त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या मार्वे रोड परिसरात राहतात. त्यांचा भाऊ राजेश हा बेस्टमध्ये वाहक म्हणून कामाला आहे. पूर्वी सरोदे कुटुंबिय मालाडच्या मालवणी परिसरात राहत होते. तिथे त्यांची अमजद सौदागरशी ओळख झाली होती. गेल्या दिड वर्षांपासून ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते, त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली होती. ऑक्टोंबर 2022 रोजी त्याने त्यांना त्याच्या मालकीचा मालाड येथील मार्वे रोड, खारोडी, दौलत शाळेसमोरी मार्वे क्वीन दोन सोसायटीमध्ये पाचव्या मजल्यावर एक फ्लॅट असल्याचे सांगितले होते. या फ्लॅटची त्याला विक्री करायची आहे, तो फ्लॅट त्यांना स्वस्तात देण्याचे आश्वासन दिले होते.

रमेश सरोदे यांनाही फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यामुळे त्यांनी त्याचा फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. फ्लॅटची पाहणी केल्यानंतर त्याने फ्लॅट खरेदीसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते. चर्चेअंती त्यांच्यात फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा 26 लाखांमध्ये व्यवहार झाला होता. या फ्लॅटवर सौदागर पती-पत्नीने गृहकर्ज घेतले होते. त्यामुळे त्याने कर्जाची परतफेड करुन त्यांना फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला टप्याटप्याने 20 लाखांचे पेमेंट केले होते. त्यानंतर अमजदने त्याच्या फ्लॅटवर हेव्ही डिपॉझिटवर एक भाडेकरु ठेवला होता. या हेव्ही डिपॉझिटची सहा लाखांची रक्कम त्याने स्वतकडे ठेवली होती.

अशा प्रकारे त्यांनी अमजद आणि आफशा यांना फ्लॅटचा संपूर्ण पेमेंट केले होते. मात्र पेमेंट करुनही ते दोघेही त्यांच्या नावावर फ्लॅट करण्यासाठी गोरेगाव येथील रजिस्ट्रेशन कार्यालयात येत नव्हते. त्यामुळे फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाले नव्हते. अमजद आणि आफशा यांनी फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार रमेश सरोदे यांच्याशी केला होता, तरीही अहमदने तोच फ्लॅट त्याच्या पत्नी आफशा हिच्या नावावर गिफ्ट डिड करुन त्याचे रजिस्ट्रेशन केले होते. हा प्रकार समजताच रमेश सरोदे यांना धक्का बसला होता. फ्लॅटची विक्री केली असता अहमदने पूर्वनियोजित कट रचून फ्लॅट तिच्या पत्नीला बक्षिसाद्वारे देऊन फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करुन त्यांची 26 लाखांची फसवणुक केली होती.

हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी घडलेला प्रकार मालवणी पोलिसांना सांगून अमजद सौदागर व त्याची पत्नी आफशा सौदागर यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या अमजद सौदागरलाला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत आफशा हिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page