मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – बकरा खरेदी व्यवसायात एक लाखांची गुंतवणुक केल्यास पाच हजाराचा दरमाह परतावा देण्याचे आमिष दाखवून एका ठगाने नऊजणांची सुमारे 83 लाखांची फसवणुक केल्याची घटना चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मोहम्मद अली मोहम्मद सलीम शेख या 38 वर्षांच्या मुख्य आरोपीविरुद्ध चेंबूर पोलिसांनी अपहारासह फसवणुक व महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद अली हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत चेंबूर पोलिसांकडे नऊजणांची तक्रार प्राप्त झाली असून आगामी काळात आणखीन काही गुंतवणुकदार पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी येण्याची तसेच फसवणुकीचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अब्दुल अजीज अब्दुल सलाम सय्यद हे मेहंदी आर्टिस्ट असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत सध्या चेंबूर परिसरात राहतात. विविध कार्यक्रमांत मेहंदी काढण्याचे करताना त्यांची सहकारी महिला निलोफरने तिला मोहम्मद अलीविषयी माहिती दिली होती. तो तिच्या काकांचा मुलगा असून त्याचा बकरी खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्याच्या व्यवसायात एक लाख रुपये गुंतवणूक केल्यास तो दरमाह पाच हजार रुपये व्याज देतो असे सांगितले.
इतकेच नव्हे तर तिने त्याच्याकडे तीन लाखांची गुंतवणुक केली असून तिला दरमाह पंधरा हजार रुपये मिळत आहे. त्यामुळे त्यांनीही त्याच्याकडे गुंतवणुक करावी असा सल्ला दिला होता. डिसेंबर 2023 रोजी तिने त्यांची मोहम्मद अलीशी ओळख करुन दिली होती. या ओळखीनंतर त्यांनी त्याच्याकडे टप्याटप्याने दहा लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर मोहम्मद अलीने त्यांना दरमाह 50 हजार रुपये व्याजाची रक्कम दिली.
ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जात होती. मार्च 2025 पर्यंत त्याने व्याजाची रक्कम नियमित बँक खात्यात जमा केली होती, मात्र नंतर त्याने व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. विचारणा केल्यानंतर त्याने एप्रिल 2025 पासून मोबाईल घेणे बंद केले होते. अनेकदा ते त्याच्या घरीही गेले, मात्र प्रत्येक वेळेस घरी नसल्याचे दिसून आले. चौकशीदरम्यान त्यांना मोहम्मद अलीने त्यांच्यासह परिसरातील अनेक लोकांकडून गुंतवणुक म्हणून लाखो रुपये घेतले होते,
काही महिने व्याजाची रक्कम दिल्यानंतर त्यांना व्याजाची रक्कम बंद झाली होती. त्याच्याकडे फरीन आरिफ शेखने चार लाख, जिनत अब्दुल शेखने दोन लाख, समीन मुबारक सय्यदने साडेनऊ लाख, मोहम्मद हमजा शेखने साडेअकरा लाख, आफसाना कासिम सय्यदने दोन लाख, आफसर बशीर शेखने चार लाख, यतिन धाकतोडेने आठ लाख, निलोफर मोहम्मद हमजा शेखने सव्वाबारा लाख तर त्यांची आई ताहेरा अब्दुल सलाम सय्यदने पंधरा लाख असे 83 लाखांची गुंतवणुक केली होती.
अब्दुल अजीज वगळता त्याने इतर आठजणांना कुठलाही परतावा दिला नाही. त्यांची मूळ रक्कम परत केली नव्हती. डिसेंबर 2023 ते ऑक्टोंबर 2025 या कालावधीत एक लाखावर पाच हजाराचे व्याजाचे आमिष दाखवून मोहम्मद अलीने तक्रारदारासह नऊजणांकडून गुंतवणुक म्हणून सुमारे 83 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणुक करुन पलायन केले होते.
हा प्रकार निदर्शनास येताच अब्दुल अजीजसह इतर आठजणांनी चेंबूर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी मोहम्मद अलीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता, महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.