भरवेगात जाणार्‍या कारची रिक्षाला धडक लागून अपघात

अपघातात महिलेचा मृत्यू तर वयोवृद्धेसह रिक्षाचालक जखमी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 मार्च 2026
मुंबई, – भरवेगात जाणार्‍या एका कारची रिक्षाला धडक लागून झालेल्या अपघातात हाफिजा बाबा शेख या 35 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला तर चांदबी हुसैन शेख या 65 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेसह विरेंद्रकुमार भगवती प्रसाद हा रिक्षाचालक जखमी झाला. जखमी दोघांवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अपघातानंतर आरोपी कारचालक पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी नेहरुनगर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आरोपी कारचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने एका महिलेच्या मृत्यूस तर दोघांना दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा अपघात सोमवारी 30 मार्चला सकाळी पावणेआठ वाजता चेंबूर येथील पोस्टल कॉलनी, पूर्व दुतग्रती मार्ग, मुंबईकडे जाणार्‍या वाहिनीवरील अमर महल ब्रिज उतरणीला झाला. विरेंद्रकुमार भगवती प्रसाद हा रिक्षाचालक असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. सध्या तो गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहतो. सोमवारी सकाळी त्याने गोवंडीतील बैंगणवाडी सिग्नल येथे प्रवाशी भाड्यासाठी थांबला होता. यावेळी त्याच्या रिक्षात दोन महिला चुन्नाभट्टी येथील स्वामी प्रमुख हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी बसल्या होत्या. या दोन्ही महिलांना घेऊन चुन्नाभट्टीच्या दिशेने जात होती.

सकाळी पावणेआठ वाजता ती रिक्षा अमर महल ब्रिज उतरणीजवळ येताच मागून भरवेगात येणार्‍या एका कारने त्यांच्या रिक्षाला जोरात धडक दिली होती. या अपघातात त्याच्यासह प्रवाशी म्हणून बसलेल्या दोन्ही महिला गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. स्थानिक लोकांकडून ही माहिती प्राप्त होताच नेहरुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातात जखमी झालेल्या तिघांनाही तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे हाफिजा बाबा शेख या महिलेस महिलेस डॉक्टरांनी मृत घोषित केले तर विरेंद्रकुमार प्रसाद आणि चांदबी हुसैन शेख यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते.

हाफिजा आणि चांदवी या दोघीही गोवंडीतील बैंगनवाडीतील रहिवाशी आहेत. याप्रकरणी विरेंद्रकुमारची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका महिलेच्या मृत्यूस तर रिक्षाचालकासह वयोवृद्ध महिलेला गंभीररीत्या दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर कारचालक मृत आणि जखमींना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने कारचालकाचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page