मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ एप्रिल २०२४
मुंबई, – रिक्षाच्या धडकेने उत्तम महादेव सोळवंडे या ५५ वर्षांच्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर रिक्षाचालकाने पलायन केले असून त्याच्याविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी हलगर्जीपणाने रिक्षा चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हा अपघात सोमवारी पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारास चेंबूर येथील एम. जी रोड रोड, बालाजी टायर्ससमोर झाला. गोपी दादू सोळवंडे हा इस्टेट एजंट असून तो गोवंडीतील इंदिरानगर, बसवेश्वर चाळीत राहतो. उत्तम हा त्याच्या मोठ्या चुलत्याचा मुलगा असून तो याच परिसरात त्याच्या पत्नी आणि मुलीसोबत राहतो. सत्यम शॉपिंग सेंटरमध्ये तो सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. रविवारी त्याची रात्रपाळी होती, सकाळी पाच वाजता काम संपल्यानंतर तो त्याच्या सायकलवरुन जाण्यासाठी निघाला. मात्र सकाळी सात वाजेपर्यंत तो घरी आला नव्हता. त्यामुळे त्याची पत्नी त्याच्या कामाच्या ठिकाणी गेली होती. यावेळी तिला उत्तम हा पाच वाजता घरी निघून गेल्याचे समजले. त्याचा शोध घेताना तिला बालाजी टायर्सजवळ त्याची सायकलसह रक्त पडल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने तिथे चौकशी सुरु केली होती. यावेळी तिला सकाळी तिथे अपघात झाल्याचे समजले. त्यामुळे तिने गोपी सोळवंडेला ही माहिती दिली. त्यानंतर ते दोघेही राजावाडी रुग्णालयात गेले. तिथे त्यांना उत्तम हा सायकलवरुन घरी जात असताना त्याच्या बाईकला एका रिक्षाचालकाने धडक दिली होती. या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला होता.
जखमी अवस्थेत त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. परिसरातील सीसटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर त्यांना एका रिक्षाचालकाने उत्तमच्या सायकलला धडक दिल्याचे दिसून आले. अपघातानंतर रिक्षाचालक तेथून पळून गेला होता. हा प्रकार उघडकीस येताच गोपी सोळवंडे याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.