प्रॉपटीचा हिस्सा मागितला म्हणून लहान भावाला चाकूने भोसकले
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत मोठ्या भावाला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 जुलै 2025
मुंबई, – प्रॉपटीवरुन झालेल्या वादानंतर प्रॉपटीचा हिस्सा मागितला म्हणून लहान भावाला मोठ्या भावाने चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना चेंबूर परिसरात घडली. या हल्ल्यात सुरजमोहम्मद रामकिशोर ठाकूर हा भाऊ गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर सायल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून चंद्रमोहन रामकिशोर ठाकूर या 32 वर्षांच्या आरोपी मोठ्या भावाला अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजता चेंबूर येथील म्हाडा कॉलनी, पुष्पांजली इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या फ्लॅट क्रमांक 102 मध्ये लगीना रामकिशोर ठाकूर ही महिला राहत असून सुरजमोहन आणि चंद्रमोहन हे तिचे दोन मुले आहेत. शुक्रवारी सायंकाळी तिचा मोठा मुलगा चंद्रमोहन हा घरी चाकूने भाजी कापत होता. याच दरम्यान तिचा लहान मुलगा सुरजमोहन तिथे आला. त्याने प्रॉपटीवरुन शिवीगाळ करुन आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी लगीना आणि चंद्रमोहनने त्याला शिवीगाळ करु नकोस अशी ताकिद दिली होती. तरीही तो त्यांना शिवीगाळ करत होता. चंद्रमोहनमुळे त्याचे बँक खाते बंद झाले आहे.
घरातील सर्व प्रॉपटी त्याच्या नावावर आहे, माझ्याकडे काहीच प्रॉपटी नाही असे बोलून त्यांच्याशी वाद घालू लागला. वारंवार समजूत घालूनही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे चंद्रमोहनने तुला प्रॉपटी हवी आहे ना असे बोलून त्याच्याकडील चाकूने त्याच्या पोटात भोसकले. त्यात सुरजमोहन हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार करण्यात आले. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी लगीना ठाकूर हिच्या जबानीवरुन घडलेला प्रकार उघडकीस आला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चंद्रमोहनविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत शनिवारी अटक केलेल्या चंद्रमोहनला रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यांतील चाकू हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.