कंपनीच्या ३० लाखांचा वरिष्ठ अधिकार्‍याकडून अपहार

चेंबूर येथील घटना; अधिकार्‍याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – विविध सात कंपन्यांकडून आलेल्या पेमेंटच्या सुमारे तीस लाखांचा वरिष्ठ अधिकार्‍याने अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नरेश सावला या वरिष्ठ अधिकार्‍याविरुद्ध चेंबूर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. नरेश हा पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.

सुरेश आनंदवेल नाडर हे धारावीचे रहिवाशी असून चेंबूर येथे त्यांचा लॉजिस्टिकचा व्यवसाय आहे. २०१४ साली त्यांनी स्वतची युनिकॉर्न शिपिंग आणि लॉजिस्टिक नावाची एक कंपनी सुरु केली होती. ही कंपनीत देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिकचे काम करतात. त्यांच्या कंपनीत नऊ कामगार असून नरेश सावला हा वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला आहे. त्याच्यावर कंपनीसाठी व्यवसाय आणणे, मार्केटमध्ये फिरुन वेगवेगळ्या कंपन्यांचे शिपमेंट तसेच कच्चा-पक्का माल गोळा करणे, तो माल इतर भारतासह इतर देशात आया-निर्यात करणे आदी कामााची जबाबदारी होती. या संपूर्ण कामासह आर्थिक व्यवहाराची जबाबदारी त्याच्यावर त्यांनी सोपविली होती. त्यासाठी त्याला कंपनीची अकाऊंटट अनिशा मुर्गन ही मदत करत होती. सुरुवातीला हा सर्व व्यवहार चेक किंवा बँक टू बँक ट्रान्स्फरने होत होता. मात्र गेल्या दिड वर्षांपासून नरेशने वेगवेगळ्या कंपन्यांकडून कॅश स्वरुपात पेमेंट घेतले होते. ही रक्कम नंतर तो कंपनीत जमा करत होता.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो पेमेंट जमा करण्यास विलंब लावत होता. त्याच्याकडून थकबाकी वाढू लागली. हा प्रकार अनिशा मुर्गनकडून समजताच सुरेश नाडर यांना नरेश सावलाविरुद्ध संशय येऊ लागला. त्यामुळे त्यांनी संबंधित कंपनीकडून आलेल्या पेमेंटची तसेच नरेशने कंपनीत जमा केलेल्या पेमेंटची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना नोव्हेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत नरेश सावला विविध सात कंपन्यांकडून ६३ लाच ८४ हजार ५३१ रुपये घेतल्याचे समजले. मात्र त्यापैकी ३३ लाख ९२ हजार ५०० रुपयांचे पेमेंट त्याने कंपनीत जमा केले होते. उर्वरित सुमारे तीस लाखांचे पेमेंट त्याने जमा केले नव्हते. याबाबत त्याच्याकडे विचारणा करण्यात आली होती. यावेळी त्याने पैशांची गरज असल्याने पेमेंट जमा केले नाही. आपण लवकरच नाशिकचे घर विकून तीस लाखांचे पेमेंट जमा करु असे सांगितले.

मात्र त्याने दिलेल्या मुदतीत पेमेंटची रक्कम जमा केली नाही. विचारणा केल्यानंतर त्याने सिक्युरिटी म्हणून काही धनादेश दिले होते, मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले नाही. त्यानंतर तो विविध कारण सांगून सुरेश नाडर यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकारानंतर त्यांनी नरेश सावला याच्याविरुद्ध चेंबूर पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page